राजनांदगावच्या कंपनीला ५0 लाखांचा ठोठावला दंड

0
18

देवरी,दि.19 : तालुक्यातील कोसबी बूज येथे कुक्कुटपालन केंद्राच्या कामात २५९ ब्रास वाळू व ७0 ब्रास मुरमाचा अवैधरीत्या वापर केल्याचे प्रकरण १७ मे रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी १४ जून रोजी तहसीलदारांनी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील श्री एबिस एक्स्पोर्ट इंडिया प्रा. लि.चे डायरेक्टर सुलतानअली अब्दुल अजीज यांच्यासह त्यांचे सहायक मोहनसिंग मुल्लासिंग ढल्ला यांना दंडाचे ५0 लाख ८२ हजार रूपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
कोसबी बूज येथे राजनांदगाव येथील श्री एबिस एक्स्पोर्ट इंडिया प्रा.लि.चे डायरेक्टर सुलतानअली अब्दुल अजीज यांच्यातर्फे मोहनसिंग मुल्लासिंग ढल्ला यांनी कुक्कुटपालन केंद्राचे काम सुरू केले आहे. या कामात अवैधरीत्या वाळू, गिट्टी व मुरमाचा वापर होत असल्याची माहिती मिळताच आंभोरा व खामखुर्राच्या तलाठय़ाने चौकशी केली असता अंदाजे ३६0 ब्रास वाळू, ५0 ब्रास गिट्टी व ७0 ब्रास मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आहे. याप्रकरणी पंचनामा करून आरोपींना चौकशीकरिता बोलविण्यात आले. त्यावेळी आरोपीने गिट्टी व वाळू उत्खनन करून वाहतूक केल्याच्या पावत्या तहसील कार्यालयात जमा केल्या. पावत्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी केली असता, गिट्टीच्या पावत्या खर्‍या असल्याने दिसले. वाळूच्या एकूण १२७ वाहतूक पावत्यांची पडताळणी केली असता ९८ पावत्यांपैकी ६६ वाहतूक पावत्या संशयित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पावत्या अमान्य करण्यात आल्या. तसेच प्रती ब्रास वाळूच्या बाजारमुल्याप्रमाणे २५९ ब्रास वाळूवर पाच पट दंड ४६ लाख ६२ हजार रूपये व प्रती ब्रास मुरमाच्या बाजारमुल्याप्रमाणे ७0 ब्रासवर पाच पट दंड ४ लाख २0 हजार असा एकूण ५0 लाख ८२ हजार रूपयांचा दंड सरकार तिजोरीत जमा करण्याचे आदेश आरोपींना दिले आहेत. ही रक्कम तत्काळ जमा न झाल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीच्या वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.