६ वर्ल्डकपमध्ये भारताचा इंग्लंडवर दबदबा कायम

0
17

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- आयसीसी वर्ल्डकप २०१९मध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंग्हम येथील अॅजबेस्टन स्टेडियमवर सामना रंगणार आहे. एकीकडे भारतीय संघाने या वर्ल्डकपमध्ये आपला विजय रथ कायम ठेवला आहे तर दुसरीकडे सुरूवातीला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाचा सेमीफायनलमधील प्रवेश मात्र खडतर झाला आहे. यातच आजचा सामना टीम इंग्लंडसाठी करो वा मरो आहे. त्यांना या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भारताविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यांचा या स्पर्धेतील प्रवास येथेच संपेल.

दोनही संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आलेत. यात दोनही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकलेत. २०११मध्ये बंगळुरूमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णीत अवस्थेत राहिला होता. त्यामुळे ते आता आठव्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत. यात विशेष म्हणजे १९९२नंतर आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाला एकदाही टीम इंडियाला मात देता आलेली नाही.

टीम इंडियाचे पारडे जड

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सुरूवातीपासूनच टीम इंडियाचे पारडे जड आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण ९९ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यातील ५३ सामने भारताने जिंकले तर ४१ सामन्यांत इंग्लंडला विजय मिळवता आला. दोन्ही संघांदरम्यान २ सामने बरोबरीत सुटले तर ३ सामने अनिर्णीत राहिले. यातच रविवारी या दोनही संघादरम्यान आज १००वा वनडे सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भगव्या जर्सीमध्ये खेळणार टीम इंडिया

आजचा सामना हा टीम इंडियासाठी आणखी एका कारणासाठी खास असणार आहे. आज टीम इंडियाच्या आपल्या नेहमीच्या ब्लू जर्सीमध्ये खेळणार नसून भगव्या जर्सीमध्ये खेळणार आहे. ही विशेष जर्सी केवळ या सामन्यासाठी असेल.

२० वर्षांपूर्वी टीम इंडियाने मारली होती बाजी

२० वर्षांपूर्वी इंग्लंडच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ अॅजबेस्टनमध्ये एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना राहुल द्रविडच्या ५३ धावांच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ८ बाद २३२ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ हे आव्हान पार करू शकला नाही. सौरव गांगुली(२७/३), जवागल श्रीनाथ(२/२५) आणि अनिल कुंबळे(२/३०) शानदार गोलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले होते. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४५.२ ओव्हरमध्ये १६९ धावांवर बाद झाला होता.