महाराष्ट्र कन्या स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार प्रदान    

0
16

               नवी दिल्ली, 16 :  क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट् कन्या क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार  प्रदान करण्यात आला.येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये स्थित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित शानदार कार्यक्रमात  केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी क्रिकेटपटू स्मृती मनधाना व टेनिसपटू रोहन बोपन्ना यांना वर्ष 2018 चे अर्जुन पुरस्कार प्रदान केले. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            मागील वर्षी 25 सप्टेंबर या राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८’ चे वितरण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी श्रीलंकेत क्रिकेट सामना सुरु असल्याने स्मृती मानधाना या कार्यक्रमात  उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. म्हणून त्यांना घोषित झालेला अर्जुन पुरस्कार आज श्री. किरेन रिजीजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

             मुंबईत जन्मलेल्या २२ वर्षीय स्मृती मानधनाचे बालपण सांगली जिल्हयात गेले. वयाच्या ९ व्या वर्षीच महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. वयाच्या ११ व्या वर्षी  महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात त्यांची वर्णी लागली होती. १९ वर्षांखालील संघातून खेळताना त्यांनी गुजरातविरुद्ध नाबाद २२४ धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणा-या त्या पहिली महिला खेळाडू ठरल्या. १० एप्रिल २०१३ ला त्यांनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यांनी ५५ एकदिवसीय सामन्यात १९५१ धावा केल्या आहेत. प्रसंगी ऑफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या मानधना यांनी भारतीय संघात सलामीच्या फलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे.