जिल्ह्यात प्रथमच किलबिल नेचर क्लब निसर्ग मंडळाची स्थापना

0
21

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.18 : विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्यातूनच भविष्यात निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारे नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने क्रेन्स (कन्झर्वेशन, नेचर, एज्युकेशन सोसायटी) च्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रथमच विद्यार्थ्यांच्या निसर्ग मंडळाची बुधवारी (दि. १७) स्थापना करण्यात आली. किलबिल नेचर क्लब असे नाव या मंडळाला देण्यात आले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी उपस्थित होते. तसेच निसर्ग अभ्यासक तथा वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे, मुख्याध्यापक सुधीर गोहणे, आय फार्मचे संचालक राजेश इटनकर, सिड संस्था तसेच विनर्स अकॅडमीचे संचालक सतीश चिचघरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी म्हणाले की, दिवसेंदिवस होत असलेला निसर्गाचा -हास मानवी विनाशास कारणीभूत ठरणार आहे. म्हणून निसर्ग संवर्धनाचे संस्कार बालकांवर करण्याची गरज आहे. किलबिल नेचर क्लबसारख्या उपक्रमातून बालकांना निसर्गाविषयी आवड निर्माण होईल आणि ते निसर्गरक्षणासाठी सज्ज होतील. शिवाय या क्लबच्या माध्यमातून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळणार असल्याने भूगोल, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र असे अनेक विज्ञानाचे विषय शिकणे सुलभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किलबिल नेचर क्लबमध्ये सहभागी होऊन निसर्ग रक्षण करणारे सैनिक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन करत या उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, संचालन मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी केले तर आभार क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

असे होईल कार्य…
निसर्ग संवर्धनात विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागी करून घेणे हा किलबिल नेचर क्लबचा उद्देश आहे. या वर्षी हा उपक्रम केवळ पाच शाळांमध्ये राबविण्यात येणार असून पंडित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा ही पहिलीच शाळा आहे. या प्रत्येक शाळेतील कार्यकारिणीत २० विद्यार्थी राहतील. या विद्यार्थ्यांना ग्रीन कमांडो नाव देण्यात येईल व त्यांना निसर्ग संवर्धनासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षित करण्यात येईल. त्यांच्यासाठी वनभ्रमंती, पक्षीनिरीक्षण, वन्यप्राणी दर्शन, वनौषधी दर्शन आदी उपक्रम राबविण्यात येतील. निसर्ग विषयक अभ्यास दौ-यामध्ये सहभागी करून घेण्यात येईल. निसर्गशिक्षणातून त्यांच्या शैक्षणिक संकल्पना अधिक स्पष्ट व सुलभ करण्यात येतील. या उपक्रमासाठी इतर शाळा उत्सुक असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.