सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या दारावर?

0
8

गोंदिया- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित राष्ट्रवादीचा एक गट काल पासून भारतीय जनता पक्षाच्या दारात प्रवेश करण्यासाठी उंबरठे झिजवत असल्याची चर्चा काल पासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे सहकार क्षेत्रातील एका बड्या बँकेचे अध्यक्ष आपल्या आठ संचालक सहकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षांतरासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करीत असल्याची माहिती बाहेर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच राष्ट्रवादीच्या एका राष्ट्रीय नेत्याने त्या बँकेच्या अध्यक्षाला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. यामुळे चिडून जाऊन त्या संचालकाने चक्क राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या अन्य संचालकांना फूस लावून आपले पद कसे वाचविता येईल, याला महत्त्व दिल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे. भाजपने पक्ष वाढीसाठी पूरक असल्याने या पक्षांतरासाठी आपल्या वरिष्ठांकडे जोर लावल्याची माहिती आहे. हे पक्षांतर मुंबई येथे काल होणार होते. पण काही तांत्रिक कारणाने ते होऊ शकले नसल्याची माहिती आहे. या संचालक मंडळासह काही नगरपंचायतीचे सदस्य सुद्धा राष्ट्रवादीला बाय-बाय करून भाजपच्या दारात उभे असून खरे काय ते येणारा काळ सांगू शकेल. सध्यातरी दोन्ही पक्षाच्या वतीने याविषयावर कोणीही भाष्य करताना दिसत नसले तरी चर्चांच्या बाजाराची दाहकता वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे या बँकेच्या अध्यक्षांनी यापूर्वी सुद्धा विधान परिषद सदस्य निवडणुकीत पक्ष विरोधी कार्यवाही करून भाजपला सहकार्य केल्याचे सांगितले जाते.