दिव्यांग, निराधारांना मानधन अडकल्याने युवा स्वाभिमान आक्रमक

0
11

गोंदिया,दि.19 : तालुक्यातील दिव्यांग, निराधार, निराश्रितांचे मागिल 4 महिन्यांचे मानधन अडकल्याने युवा स्वाभिमानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आठ दिवसात लाभार्थ्यांना तत्काळ मानधन द्या अन्यथा, एसडीओ कार्यालयात ठीय्या आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला. दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे मानधन अडकले होते, ते अवघ्या दोन-चार दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन एसडीओ वालस्कर यांनी दिले.
युवा स्वाभिमानचे गोंदिया जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना दिव्यांग निराधार आणि निराश्रितांच्या समस्येसंदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला नियमित मानधन देण्यात यावे, मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. गोंदिया तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.