स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला मिळाले मागंगारोडी समाजाला राशन कार्ड

0
40

गोंदिया,दि.15– गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या मांगगारोडी समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गोंदियातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निस्वार्थ पुढाकार घेत कार्य सुरुच ठेवले होते.त्यांच्या या लढ्याला यश आले असून 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मांगगारूडी समाजाची वस्ती असलेल्या कुडवा नजीकच्या अण्णाभाऊ साठे नगर येथे बुधवारला(दि.14) राशन कार्डचे वाटप, आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले.विशेष म्हणजे यासाठी सातत्याने समाजकल्याण विभाग असो की तहसिल कार्यालयाकडे गेल्या 10-12 वर्षापासून पाठपुरावा केला तो समाजसेविका प्रा.एड.सविता बेदरकर(भुरले)व धनेंद्र भुरले यांनी.

त्यातही या समाजाला सर्वात आधी शासकीय योजनाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त व तत्कालीन गोंदियाचे विशेष समाजकल्याण अधिकारी अनिल देशमुख व पाटबंधारे विभागात नोकरीला असलेले दुलीचंद बुध्दे व त्यांच्या सहकारी मित्रांनी केलेल्या कार्याला पुढे यशस्वतीकडे नेण्याचे कार्य प्रा.सविताताईं बेदरकर(भुरले)यांनी निस्वार्थपणे सुरुच ठेवले अन आज त्यांच्या या लढ्याला यश आले.गेल्या 72 वर्षापासून ज्यांना रेशनकार्ड नव्हते नव्हे तर ते कसे होईल कुठल्या आधारावर होईल याविवंचनेत अधिकारी विषय बाजुला सारायचे अशा परिस्थिती मनात नकारात्मक भूमिका समोर असतानाही भुरले दाम्पत्यांनी या विषयाला मात्र सोडले नाही.अधिकारी वर्गाला त्या समाजाच्या परिस्थितीची जाणिव आणि त्यांच्या व्यथेची जाण करुन देत त्यांना या गोष्टींची नितांत गरज कशी हे पटवून देण्याचे काम केले.त्यांच्या या भूमिकेलाही समाजकल्याण व तहसिल विभागाच्या अधिकार्यांनी स्विकारले आणि सामाजिक जाणिवेतून गेल्या 72 वर्षापासून रेशनकार्डपासून वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला.
आमचे स्वातंत्र्य आता 72 वर्षाचे झाले. परंतु अजूनही मूलभूत सोयींपासून वंचित असलेला हा समाज त्यांच्या हाती राशन कार्ड पडले आणि आधारची नोंदणी झाली. ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत त्यांची आधार नोंदणी होऊ शकली नाही . ज्यांचा जन्मच रस्त्यावर, कधी जंगलात, कधी ट्रेनमध्ये, कधी कुठल्या प्रांतात झाला. ठार अक्षरशत्रू नोंदणी कुठे करावी हे सुद्धा यांना माहित नाही ना यांच्या विवाहाच्या नोंदण्या, ना जन्माच्या नोंदणी अशावेळेस यांचे आधार कार्ड बनवायचे कसे? दुसरा एक प्रश्न आला की आधार साठी मोबाईल लिंकिंग पाहिजे त्यांच्याजवळ मोबाईलच नाही तो ओटिपी नंबर येईल कसा? हा प्रश्न मनात निर्माण झाला,त्यानंतर त्यांच्या जन्माच्या दाखल्यासाठी कोर्टामध्ये केस टाकण्याचे ठरवल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सविताताई म्हणाल्या. त्यासाठी आपण वकीलांसोबत बोलणे केले.त्या सर्व प्रकियेनंतर चला या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या मांगगारोडी समाजाच्या नव्या अध्यायाची सुरवात झाली अन! जवळपास सगळ्यांचे राशन कार्ड तयार झाल्याचे सांगितले.
या सर्व प्रकरणात सहकार्य करण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका नुकतेच बदलून गेलेले विशेष समाज कल्याण अधिकारी मंगेश वानखेडे आणि विद्यमान विशेष समाज कल्याण अधिकारी वाकले यांची राहीली.पण या सगळ्या गोष्टीत विशेष लक्ष देऊन काम करणारे विशेष समाजकल्याण विभागाचे कर्मचारी लक्ष्मण खेडेकर यांचाही या समाजाच्या नव्या उद्यात खारीचा वाटा असल्याचे सविताताई यांनी सांगितले. 

 रेशनकार्ड वाटप कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालयाच्या निरिक्षण अधिकारी कु. भारती वाकोडे, पुरवठा निरिक्षक पी.जी. हांडे,कनिष्ठ लिपीक कमलेश मेश्राम यांच्यासह अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.