पिपरटोला जि.प. शाळेला शिक्षक द्या अन्यथा कुलूप ठोकणार

0
17

गोरेगाव,दि.18ः-तालुक्यातील पिपरटोला येथे जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक शाळेकरीता शिक्षकाची मागणी करुनही शिक्षक उपलब्ध करुन न दिल्याने पालकांनी पंचायत समितीकडे धाव घेत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.शाळेत वर्ग १ ते ७ वीपयर्ंत विद्यार्थी या शिक्षण घेतात. पण यावर्षी शाळा सुरु झाल्यापासून एकच शिक्षक आहे. गावकर्‍यांनी तीनदा शिक्षक द्या अशी लेखी मागणी पंचायत समिती व जि.प.कडे केली. दोन महिने होऊन शिक्षक न मिळाल्याने पालकांमध्ये असंतोष बळावला आहे. गावच्या शाळेत वर्ग १ ली ते ७ वी पयर्ंत ८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यासाठी फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक न मिळाल्याने गावकर्‍यांनी १६आँगष्ट रोजी खंडविकास अधिकारी एस.एम. लिल्हारे यांना लेखी निवेदन दिले. तसेच चार दिवसात शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ही देण्यात आला.
सध्या गावखेड्यातील शेतकरी पर्‍हे लावण्याच्या कामात व्यस्त आहे. सर्व कामे सोडून शिक्षकांच्या मागणी साठी पालकांना धावाधाव करावी लागत आहे. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी राबराब राबून मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मेहनत करून प्रत्येक पालक प्रयत्न करीत आहे. पण शासनाच्या शैक्षणिक कामातील गलथान कारभारामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता खालावलेली दिसून येत आहे. गेल्या २ महिण्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना कोण शिकवणार हा जटील प्रश्न गावकर्‍यासमोर आहे. अधिकार्‍यांना निवेदन देऊन मागणी पूर्ण झाली नाही तर कुणाकडे दाद मागावी हा गंभीर प्रश्न आहे. म्हणून आता शिक्षक न मिळाल्यास शाळा कुलूप बंद करण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे. यावेळी गावातील माता पालक प्रामुख्याने उपस्थित होते.