सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ

0
8

गोंदिया ,दि.4-: दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात तसे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, परवानाधारक सावकारास शेतकर्‍यांकडून ३0 नोव्हेंबर २0१४ अखेर येणे असलेले कर्ज व या कर्जावर शासनाने विहित केलेल्या व्याजदराने ३0 जून २0१५ पर्यंत होणारे व्याज या योजनेत पात्र राहणार असून ती रक्कम शासनामार्फत सावकारास अदा केली जाणार आहे.
यंदा सर्वत्न दुष्काळी स्थिती आहे. सततच्या नैसिर्गक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भ व मराठवाडा या दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकर्‍यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे यंदाची स्थिती बघता सावकारांकडून शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश प्राप्त झाले असून शासन या परवानाधारक सावकारांना शेतकर्‍यांवर असलेल्या कर्जाची रक्कम अदा करणार आहे. यासाठी शासनाने राज्यातील अंदाजे १५६.११ कोटी व त्यावरील शासनाने विहित केलेल्या व्याजदराने होणारे व्याज सुमारे १५.१९ कोटी असे एकूण १७१.३0 कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
यासाठी परवानाधारक सावकाराने शेतकर्‍यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सह. संस्था सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यांच्याकडे प्राप्त होणार्‍या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी तहसीलदार, सदस्य सचिवपदी सह.संस्थांचे सहायक निबंधक तर सदस्यपदी सह. संस्थांच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे.