पीएसीएल कंपनीने कार्यालयाला कुलूप ठोकले

0
17

नागपूर दि. २४ –: पीएसीएल कंपनीच्या व्यवस्थापनाने १२ मेपासून नागपुरातील कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. शिवाय फिल्ड असोसिएट व ग्राहकांशी संपर्क बंद केला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, काही लोकांनी कार्यालयाची तोडफोडसुद्धा केली आहे. पीएसीएल ही देशातील एक नामांकित कंपनी असून, या कंपनीत करोडो ग्राहकांनी आपल्या परिश्रमाची जमापुंजी जमा केली असल्याची माहिती राम वाघ यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ते म्हणाले, कंपनीने लाखो एजंट व कोट्यवधी ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. मागील तीन वर्षांपासून कंपनीची स्थिती फारच डामाडौल झाली आहे. मात्र तरीही फिल्ड असोसिएट आजपर्यंत कंपनीच्या हितासाठी ग्राहकांची समजूत घालून त्यांच्यामध्ये विश्वासाची भावना निर्माण करीत होते. मात्र कंपनीने मागील एक वर्षापासून ग्राहकांना मॅच्युरिटी दिलेली नाही.

त्यासाठी ग्राहक दारोदारी भटकंती करीत आहे. दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. अधिकारी फोनसुद्धा घेत नाही. यामुळे फिल्ड असोसिएटचा जीव धोक्यात सापडला आहे.

तरी कंपनी व्यवस्थापनाने ग्राहक व फिल्ड असोसिएटचे लवकरात लवकर समाधान करावे, अन्यथा ५ जून रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. पत्रपरिषदेला रंजित मित्रे, गजानन देउळकर व प्रीती बुजाडे उपस्थित होते.