राज्यात गोंदिया अव्वल,३६४० यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया

0
15

विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिक्षणामुळे होणाऱ्या विकासाची कमतरता या भागात प्रामुख्याने जाणवते. परिणामी नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता आणणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या आरोग्यविषयक राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यामध्येही आरोग्य विभागाची मुख्य भूमिका आहे. आरोग्य विभाग आपली भूमिका व शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे हे चित्र गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे.
वर्ष २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा नेत्र शस्त्रक्रियांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी ३ हजार ६४० नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे आरोग्य विभागाने पार पाडल्या. संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या महिला आरोग्य अभियानात गरोदर माता, कर्करोग ग्रसित मातांना उपचाराकरीता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत गांभीर्याने लक्ष दयावे याबाबत विविधप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. ९८० मातांनी या विविध सेवांचा लाभ घेतला.
बाल आरोग्य अभियानाअंतर्गत विविध उपक्रमातून बालकांचे प्रबोधन व तपासणी करण्यात आली. अंगणवाडीतील बालकांना नजरेसमोर ठेवून अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे बालकांचे आरोग्य अंगणवाडीत असलेल्या वयापासून निरोगी असायला हवे त्यानुसार अंगणवाडीतील बालकांवर विशेष लक्ष देण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वर्ष २०१४-१५ मध्ये एकूण १७७५ अंगणवाडींची तपासणी करण्यात आली व एकूण २ लाख १८ हजार ५२७ बालकांची तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची प्रसूती केंद्रात व्हावी जेणेकरुन माता मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल या उद्देशाने वर्ष २०१४-१५ मध्ये राबविण्यात आलेल्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ ८ हजार २९२ महिलांनी घेतला. यातील एपीएल व बीपीएल कार्डधारक २ हजार ४१४ मातांना शासन निर्देशित अनुदानाचेही वाटप करण्यात आले. जननी शिशु सुरक्षा याजनेअंतर्गत माता व बालक यांच्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.आरोग्य विभागाने केलेल्या आरोग्यविषयक जनजागृतीमुळे व शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील आबालवृद्ध, महिला, पुरुष आता निरोगी जीवनाचा आनंद घेत आहेत.