व्यापाऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन सोमवारी नागपुरात

0
14

नागपूर दि.7- किरकोळ व्यापारामध्ये विदेशी गुंतवणूक आणि वस्तू व सेवा करावर (जीएसटी) भविष्यातील दिशा निश्‍चितीसाठी अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाच्या (कॅट) झेंड्याखाली आठ जून रोजी राष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट येथील बैठकीत सोमवारी (ता. 8) सकाळी दहा वाजता 200 पेक्षा अधिक व्यापारी नेते सहभागी होणार आहे. अध्यक्षस्थानी कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया राहणार आहे, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहुराष्ट्रीय कंपन्यातर्फे भारतातील किरकोळ बाजारात प्रवेश करण्यासाठी दबावगट तयार करीत आहे. वर्तमान किरकोळ व्यापारामध्ये उच्च तंत्रज्ञान आणि अत्याधुनिकीकराचे नवीन रस्ते शोधण्यावर व्यापारी येथे चर्चा करणार आहेत. शिवाय कॅटच्या ई कॉमर्स पोर्टलबाबत निर्णय घेतला जाईल. व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करणे आणि व्यापारी वर्गामध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापराबाबत प्रोत्साहन देण्यावर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल रोजी मुद्रा बॅंकेची सुरुवात केली आहे. या बॅंकेसोबत देशभरातील व्यापारी कसे जोडता येतील याबाबतही निर्णय होणार आहे.

जीएसटीबद्दल केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कर प्रणालीमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सर्वांत मोठी सुधारणा करण्याची घोषणा केली. मात्र, उच्च समिती आणि केंद्र सरकारने अद्याप व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. चर्चा केली नाही. व्यापाऱ्यांना विश्‍वासात न घेता निश्‍चित कालावधीत केंद्र सरकार जीएसटी लागू करण्यास यशस्वी होणार नाही. कराचे सरळीकरण करणार असल्याचे सांगून तीन करांचा बोझा जीएसटीच्या माध्यमातून लादण्याचा घाट सरकार करीत असल्याची टीका खंडेलवाल यांनी केली.

किरकोळ व्यापाऱ्यात 51 टक्के एफडीएची अधिसूचना विद्यमान सरकारने अद्याप परत घेतली नाही. भाजपने विरोधात असताना किरकोळ व्यापाऱ्यातील एफडीएला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे केंद्र सरकार हा अध्यादेश मागे घेण्याबाबत चर्चा करणार आहे. तसेच 15 ऑगस्टपासून देशभर विविध अभियान राबवून व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे खंडेलवाल म्हणाले. पत्रकार परिषदेत बी. सी. भरतीया, किशोर धाराशिवकर, फारुख अकबानी, प्रभाकर देशमुख, मोरेश्‍वर काकडे, अनिल नागपाल, राजकुमार गुप्ता उपस्थित होते.