पहिल्याच पावसात वायगाव (नि.) शिवारातील नाला ओसंडून वाहू लागला

0
9

वर्धा, दि. १६: जलयुक्त शिवार अभियानामध्ये वायगाव (निपाणी) शिवारातील वाहत असलेल्या नाल्यावर साखळी पद्धतीचे बंधारे बांधून नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे पहिल्याच पावसात 210 मीटर लांबीपर्यंत सरासरी अडीच मीटर पाणी साचले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी खोलीकरणामुळे शेतात न गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान टळले आहे. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरण केल्यामुळे या शिवारातील 190 हेक्टर क्षेत्रातील शेतीला शाश्‍वत सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणी येथील शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा नसल्यामुळे तसेच पावसाचे पाणी नाल्याद्वारे वाहून जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. जलयुक्त शिवार अभियानामध्ये गाव शिवार फेरी ग्रामस्थांनी सुचविलेल्या नाल्याच्या खोलीकरणाचे काम घेण्यात आले. कृषी विभागातर्फे 540 मीटर लांबीच्या साखळी पद्धतीने खोलीकरण करण्यात आल्यामुळे या परिसरातील नाल्याच्या पुरामुळे होणारे शेतीचे नुकसानही टळले असून 20 विहिरींतील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच उन्हाळी पिकेही घेण्यास मदत झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये वर्धा जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत सिमेंट बंधाऱ्यासह विविध कामे सुरू असून पहिल्या पावसात नाला खोलीकरणामुळे पाणी अडविण्याच्या उपक्रमाची माहिती प्रत्यक्ष वायगाव निपाणीच्या शिवारात जाऊन घेतली असता एकाच नाल्यावर 320 मीटर व 220 मीटर असे साखळीपद्धतीने पाणी अडविण्यात आले होते. संपूर्ण नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यातच साचले असून शेतामधून वाहून जाणारी मृदासुद्धा अडविण्यासाठी मदत झाली आहे. या उपक्रमाचा 29 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. तसेच जलसंधारणाच्या या उपक्रमामुळे भूगर्भातील जलसाठ्यामध्ये तसेच विहिरीतील पाण्यांमध्ये दोन ते तीन मीटर वाढ होणार आहे.

नालाखोलीकरणासाठी साखळी पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या तीनशे मीटर लांबीसाठी 2 लक्ष 90 हजार तर 220 मीटरसाठी 2 लक्ष 65 हजार खर्च झाला असून या उपक्रमामुळे सरासरी 3 टीसीएम पाण्याचा जलसाठा निर्माण होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता होत असल्यामुळे 150 हेक्टरच्या परिसरात भाजीपाला व फळांची पिके घेण्याचा निर्धार वायगावचे सरपंच गणेश मांदळे यांनी व्यक्त केला आहे.

जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना लाभ- सरपंच मांदळे

जलयुक्त शिवार अभियानामुळे नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत होते व जमीनसुद्धा खरडून जात होती. आता जलयुक्त शिवार अभियानामध्ये वायगाव निपाणी शिवारातील नाल्याचे खोलीकरणच झाले नाही तर सिमेंट बंधारा बांधल्यामुळे नाल्यात पावसाचे पाणी साचत आहे. शेतीलाही त्याचा प्रत्यक्ष लाभ होत आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही फळबाग व भाजीपाला घेणे शक्य होणार असून नाल्यातील पाणीसाठा शेतात शिरणार नाही. शेतकरीही या अभियानामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत, अशी प्रतिक्रिया वायगाव निपाणीचे सरपंच गणेश मांदळे यांनी दिली.

वायगाव निपाणी शिवारातील साखळीपद्धतीच्या 540 मीटर लांबीच्या नालाखोलीकरणाचे काम उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.उल्हास नाडे, तालुका कृषी अधिकारी बिपीनमकुमार राठोड व कृषी सहायक विलास मेघे यांच्या पुढाकाराने केवळ पंधरा दिवसांत पूर्ण झाले आहे. या कामांमध्ये पारदर्शकता असावी, यासाठी ग्रामपंचायत सरपंचासह जिल्हा परिषद सदस्य मीनाताई वाळके यांनी प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण काटकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग मिळवून दिला.