धानाला आघाडी सरकारनेच दिली सर्वाधिक भाववाढ

0
14

राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन

गोंदिया दि. २९: आपण शेतकर्‍यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकर्‍यांची चक्क दिशाभूल केली आहे. धान उत्पादकांना गेल्या दोन वर्षांपासून फक्त ५0 रुपये भाववाढ देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याउलट आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण शेतकर्‍यांच्या धानाला ६0 ते १७0 रुपयांपर्यंत भाववाढ मिळवून दिली. त्यामुळे शेतकर्‍यांचे हित जोपासणारे कोण, आम्ही की, स्वत:ला भूमिपूत्र म्हणविणारे खोटारडे नेते, हे शेतकर्‍यांनीच ठरवावे, असा घणाघात खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.
खा.पटेल म्हणाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सलग दुसर्‍या वर्षीही धानाच्या हमीभावात अवघी ५0 रुपये वाढ दिली आहे. गेल्या सहा वर्षातील धानाच्या हमीभावात झालेल्या भाववाढीचा विचार केल्यास भाजप सरकारच्या काळात सलग दुसर्‍या वर्षी दिलेली भाववाढही सर्वात कमी भाववाढ ठरली आहे. आम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांशी बोलून धानाला १७0 रुपयापर्यंत भाववाढ दिली. याशिवाय धानाला बोनस देण्याचा देण्याचा निर्णयही आमच्याच सरकारने सर्वप्रथम घेतला होता, असे खा.पटेल यांनी सांगितले. एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढत आहे. बियाणे, कीटकनाशकांच्या किमतीसह मजुरीचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत हमीभावात अपेक्षित भाववाढ केल्या जात नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांना बोनसचे गाजर दाखविले आहे. पण पुढील वर्षी हा बोनसही मिळणार नाही. ही धान उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप खा.पटेल यांनी केला.
२0११-१२ या हंगामात धानाचे भाव (जनरल ग्रेड) प्रतिक्विंटल १0८0 रुपये होते. २0१२-१३ मध्ये त्यात १७0 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर २0१३-१४ मध्ये त्यात ६0 रुपये प्रतिक्विंटल भाववाढ करण्यात आली. मात्र त्या हंगामात २00 रुपये प्रतिक्विंटल बोनस मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आघाडी सरकारचे ते सत्तेतील शेवटचे वर्ष होते. मात्र गेल्यावर्षी २0१४-१५ मध्ये सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर धानाची पहिलीच भाववाढ त्यांनी अवघी ५0 रुपये केली. त्यामुळे धानाला २0१४-१५ या हंगामात १३६0 रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव मिळाला. आता धान उत्पादक गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, हे पाहून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २५0 रुपये बोनस देण्याचे गाजर भाजप सरकारने दाखविले आहे. पण ही कायमस्वरूपी दरवाढ नाही. त्यामुळे पुढील वर्षी हा बोनस काढून पुन्हा शेतकर्‍यांची फसवणूकच केली जाणार, असा दावा खा.पटेल यांनी केला.
आघाडी सरकार व भाजप सरकारमधील धानाच्या भाववाढीचा तक्ता
आर्थिक वर्ष प्रतिक्विंटल भाव भाववाढ
■ २0१0-११ ए ग्रेड- १0३0 रुपये उपलब्ध नाही सी ग्रेड- १000 रुपये उपलब्ध नाही
■ २0११-१२ ए ग्रेड- १११0 रुपये ८0 रुपये सी ग्रेड- १0८0 रुपये ८0 रुपये
■ २0१२-१३ ए ग्रेड- १२८0 रुपये १७0 रुपये सी ग्रेड- १२५0 रुपये १७0 रुपये
■ २0१३-१४ ए ग्रेड- १३४५ रुपये ६५ रुपये सी ग्रेड- १३१0 रुपये ६0 रुपये
■ २0१४-१५ ए ग्रेड- १४00 रुपये ५५ रुपये सी ग्रेड- १३६0 रुपये ५0 रुपये
■ २0१५-१६ ए ग्रेड- उपलब्ध नाही उपलब्ध नाही सी ग्रेड- १४१0 रुपये ५0 रुपये