गोसेखुर्द कालव्यात पडून वाघाचा मृत्यू

0
18

सिंदेवाही दि. २९– वनपरिक्षेत्रात पाथरी मार्गावरील गोसेखुर्द कालव्यात सोमवार, २९ जूनला एका वाघाचा मृतदेह आढळून आला. झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. झुंजीनंतर तो कालव्यात पडला असावा, असे वनाधिकारी सांगत आहेत.
सिंदेवाहीपासून ३ किमी अंतरावर पाथरी रस्त्यावर गोसेखुर्द कालव्याचे काम सुरू आहे. या कालव्यात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. कालव्याचे काम करीत असलेल्या मजुरांनी याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्‍यांना दिली. वनकर्मचार्‍यांनी वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे यांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच, कांबळे घटनास्थळी दाखल झाले. सुमारे साडेचार वर्षे वय असलेल्या या वाघाच्या नाकातून रक्त वाहत होते. वाघाचा मृतदेह सिंदेवाही डेपोत आणण्यात आला. सिंदेवाही येथील आयटीआयसमोर असलेल्या गोसेखुर्द कालवा परिसरात ३ वर्षांपूर्वी एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यापैकीच हा एक वाघ असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती कळताच मुख्य वनरक्षक डोहे, डी. एम. राजपूत, मुख्य वनरक्षक ठाकरे, उपवनरक्षक आशीष ठाकरे, डॉ. रवी खोब्रागडे, पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे, आदित्य जोशी, वसंत कामडी घटनास्थळी पोहोचले. एफडीसीएमच्या महालक्ष्मी देवस्थान परिसरातील विश्रामगृहात वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. कालव्यात पडून किंवा आपसातील झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या परिसरात घनदाट जंगल असल्याने मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा येथे संचार आहे. मागील अडीच ते तीन वर्षांपासून कालव्याचे काम संथगतीने सुरू आहे. या कालव्याचे काम पूर्ण झाले असते, तर वाघाला जीव गमवावा लागला नसता. हा कालवा २२ ते २५ फूट खोल असून, या कामाचे नियोजन बरोबर नाही, अशी चर्चा नागरिकांंमध्ये सुरू आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.