गोंदियात काँग्रेसच्या हाताला कमळाबाईची साथ

0
30

गोंदिया जि.प.सभापतीच्या निवडणुकीतही काँग्रेसभाजप युती कायम
समाजकल्याण सभापती भाजपकडे,महिला बालकल्याण सभापती काँग्रेसकडे

गोंदिया,दि. ३१-जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीतही अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेली भाजप काँग्रेसची युती कायम राहिली.गुरुवारीही काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करीत दोन सभापतीपद आपल्या झोळीत तर दोन सभापती भाजपच्या झोळीत दिले.त्यामुळे जिल्हा परिषदेवर स्पष्टपणे काँग्रेस भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.सभागृहात राष्ट्रवादीचे २०,भाजपचे १७ व काँग्रेसचे १६ सदस्य आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या विषय समिती निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव ,तहसिलदार संजय पवार व डहाट यांनी काम पाहिले.विषय समितीच्या समाजकल्याण समिती सभापतीकरीता भाजपकडून देवराज वडगाये,राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे तर काँग्रेसकडून विजय लोणारे यांनी अर्ज दाखल केला होता.काँग्रेसचे लोणारे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने रिंगणात भाजपचे देवराज वडगाये व राष्ट्रवादीचे मनोज डोंगरे राहिले.या निवडणुकीत भाजपच्या वडगाये यांना २८ तर राष्ट्रवादीचे डोंगरे यांना २० मते मिळाली.भाजपच्या वडगाये यांना काँग्रेसचे ११ मते मिळाली,तर ५ सदस्य तटस्थ राहिले.त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून विमल नागपूरे ,भाजपकडून कमलेश्वरी लिल्हारे तर राष्ट्रवादीकडून राजलक्ष्मी तुरकर यांनी अर्ज दाखल केले होते.यात भाजपच्या कमलेश्वरी लिल्हारे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने रिंगणात राहिलेल्या काँग्रेसच्या विमल नागपूरे यांना २८ व राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २० मते मिळाली.काँग्रेसच्या नागपूरे यांना भाजपच्या १२ सदस्यांनी मतदान केले.यानंतर उरलेल्या दोन विषय समितीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून पी.जी.कटरे,गिरीश पालीवाल यांनी अर्ज दाखल केला होता.त्यापैकी गिरीश पालीवाल यांनी अर्ज मागे घेतला.भाजपकडून छाया दसरे व शोभेलाल कटरे यांनी अर्ज दाखल केला त्यापैकी शोभेलाल कटरे यांनी अर्ज मागे घेतला.राष्ट्र‹वादीकडून गंगाधर परशुरामकर व सुरेश हर्षे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.या निवडणुकीत पी.जी.कटरे यांना २९,छाया दसरे यांना २८ व राष्ट्रवादीचे परशुरामकर व हर्षे यांना प्रत्येकी २० मते मिळाली.या निवडणुकीत काँग्रेसचे पी.जी.कटरे व भाजपच्या छाया दसरे विजयी झाल्या.
नवनियुक्त सर्व सभापतीनी आजच सभापती पदाची सुत्रे स्विकारली.

काँग्रेसचे पाच सदस्य राहिले तटस्थ
सभापतीपदाच्या या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या पाच सदस्यांमध्ये दीपक पवार, विठोबा लिल्हारे, सीमा मडावी, शेखर पटले आणि विजय लोणारे या पाच जि.प.सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे यातील चार सदस्य गोंदिया तालुक्यातील आहेत. त्यामुळे हे सदस्य पक्षादेश धुडकावल्याच्या कारवाईतून सुटू शकतात.

भाजपला मतदान करणाèया सदस्यावर कारवाई करणार-माणिकराव ठाकरे
गोदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत झालेल्या काँग्रेस भाजप युतीवर जोरदार टिका झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वरच्यापातळीवर या विषयाला जोरदार विरोध केल्यानंतर सभापतीच्या निवडणुकीत तरी काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीसोबत जावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.परंतु जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी प्रदेश काँग्रेसच्या निरिक्षकांना स्पष्टपणे राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाण्यास नकार देत व प्रदेश काँग्रेसच्या निर्णयाला फेटाळत पुन्हा विषय समितीच्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याचे चित्र समोर आले.विशेष म्हणजे निवडणुकप्रकिया होण्याआधीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निरिक्षक सुभाष धोटे,के.के.पांडे ,आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या उपस्थितीत पत्रपरिषद घेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांना प्रदेश काँग्रेसचे निर्णय पाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.तसेच कुठल्याही परिस्थितीत भाजपला सहकार्य न करण्याचे निर्देश देत पक्ष आदेश न पाळणाèया सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.भाजप आमचा विरोधी पक्ष असल्याने त्यांच्यासोबत सत्तेत कुठल्याही परिस्थितीत राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले.युती संदर्भात प्रत्येक जि.प.सदस्य व नेत्यांची मते जाणून घेतली परंतु सर्वांनाची राष्ट्रवादीशी युतीचा विरोध केला.तरीही प्रदेश काँग्रेसच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र जैन यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ३ सभापती पदासह अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली.आम्ही त्यांना दोन सभापती पद देण्यास तयार असल्याचे कळविले परंतु त्यांनी नकार दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.काँग्रेसकडे आधीच कमी सदस्य संख्या असल्याने आमचा पराभव होणार असला तरी आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराकडे गटनेत्याला स्पष्ट निर्देश देत सभागृहात भाजपला मदत न करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितल्याचे म्हणाले.परंतु आता प्रदेश काँग्रेसच्या निर्णयाला काँग्रेस सदस्यांनी ठेंगा दाखविला.

काँग्रेस-भाजपची युती वरच्यापातळीवर-परशुरामकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हापरिषद सदस्य व गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले की,भाजप आणि काँग्रेसची वरच्या पातळीवरच युती झाली असल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबत सत्तेत येण्यास नकार दिला.आम्ही ३ सभापती पदाची मागणी व अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला होता.परंतु काँगेसकडून यावर कुठलेही आम्हाला उत्तर न आल्याने आम्ही पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.सत्तेत आम्ही नसलो तरी सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून कुठलीही फाईल कुठल्या आमदाराच्या घरी जाऊ देणार नाही यासाठी स्पष्टपणे विरोधाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पाडणार असल्याचे परशुरामकर यांनी सांगितले.