कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

0
14

गडचिरोली,दि.22--गडचिरोली जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी  दिपक सिंगला संपन्न यांचे अध्येक्षतेखाली समिती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषि विकास अधिकारी  पी.झेड.तुमसरे ,मोहिम अधिकारी के. जी. दोनाडकर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संजय मेश्राम उपस्थित होते.
बैठकीमध्ये येत्या खरीप हंगाम 2021 च्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये खते,बियाणे,कीटकनाशके यांची मागणी, पुरवठा वाहतूक व वाटप यांचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात सध्यस्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू केलेली आहे.परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमीन तयार करणे ,बियाणे ,रासायनिक खतांची पुरेशी साठवणूक करणे इत्यादी बाबी आवश्यक ठरतात ,त्यामुळे प्रशासनाने कृषि निविष्ठांचे दुकाने सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 वा पर्यंत कोविड-19 च्या अटींचे अधीन राहून सुरु ठेवणेबाबत परवानगी दिलेली आहे.तसेच शेतकऱ्यांना पूर्णवेळ मुभा असणार आहे.
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये एकुण पिकाखालील क्षेत्र 214004 राहील असे निर्धारित केले असून त्यानुसार महाबीज व खाजगी कंपन्यामार्फत बियाणे पुरवठा होणार आहे.त्यासाठी कृषि विभागामार्फत बियाणेचे नियोजन केले आहे.
चालूवर्षी खरीप हंगामासाठी कृषि आयुक्तालयाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी एकुण 50200 मे.टन वेगवेगळ्या ग्रेडचे रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले,त्याचप्रमाणे1900 मे.टन युरिया खताचे बफ्फर साठा सुद्धा मंजूर आहे. येत्या खरीप हंगामात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात खते प्राप्त होतील.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या कृषि निविष्ठा प्राप्त होण्यासाठी कृषि विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या आहेत.भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकाकडून बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.वेळप्रसंगी प्राप्त बियाणे व खतांचे नमुने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत,जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषि निविष्ठा प्राप्त होतील.अनुदानित रासायनिक खते विक्रीकरिता रासायनिक खते विक्रेत्यांना ई पॉस मशीन शासनाकडून पुरविण्यात आलेल्या असून फक्त ई पॉस मशिनधारक विक्रेत्यांनाच अनुदानित रासायनिक खते विक्री करता येणार आहे.
मा. जिल्हाधिकारी श्री. दिपक सिंगला यांनी कृषि विभाग व पोलीस प्रशासनाला बोगस बियाणे व खतांची विक्री होणार नाही,याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचित केले. या बैठकीला विविध रासायनिक खत कंपनीचे विक्री अधिकारी ,एम. आय. डी.सी.चे.विभागीय व्यवस्थापक , विदर्भ को.मा.फेडरेशन तसेच जिल्ह्यातील कृषि निविष्ठांचे घाऊक विक्रेते उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व आभार मोहिम अधिकारी  के. जी. दोनाडकर यांनी केले.