नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल – पालकमंत्री दादाजी भुसे

0
27

पालघर दि. 22 :- तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत उपस्थित होते.तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान झाले असून विद्युत खांब देखील पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू – पालकमंत्री दादाजी भुसे

“म्युकरमायकोसीस” तसेच लहान मुलांना होणारे आजार आणि कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.भुसे बोलत होते.

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील नऊशे (900) गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. यापैकी आठशे (800) गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. जवळपास 941 कर्मचारी व अधिकारी यांनी कमी वेळेत सदर गावाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

तोक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत कोविड रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्यात आला होता. चक्रीवादळामुळे, शेती तसेच फळपिकांचे त्याचबरोबर मच्छीमार, वीटभट्टी कुक्कटपालन आदिचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी सुसज्ज आणि अद्ययावत सामान्य रुग्णालय निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जव्हार, डहाणू आणि पालघर येथे ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठीचा प्रकल्प येत्या महिन्याभरात पूर्णत्वास येईल, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पालघर जिल्ह्यातील खंडीत झालेल्या वीज पुरवठ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, राजेश पाटील, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यावस्थापकीय संचालक विजय सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम साळीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदि अधिकारी आढावा बैठकीस उपस्थित होते.