बुलडाणा -एकाच वेळी जळगाव जा. तालुक्यातील तरोडा बु. येथील शेत शिवारात १० काळवीटांचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. त्यानंतर १५ मे रोजी आणखी ३ काळविट मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले होते. दरम्यान वनविभागाच्या तपास यंत्रणेला ५ दिवसात आरोपीचा छडा लावण्यात यश आले असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. राधुसिंग छत्तरसिंग डावर, (वय ३३,रा. हनवतखेड ता.जळगाव जामोद ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २४ मे पर्यंत वनकोठडी सुनावली. शेत परिसरातील पाणवठ्याच्या ( शेतातील गड्डा) जागेवर शिकारीसाठी विष टाकले होते. त्यामुळे तब्बल १३ काळवीट मरण पावली. यातील एका काळविटाचे काही मासही आरोपीने खाण्यासाठी नेल्याची कबुली दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी दिली आहे.