गोंदिया, 22 मे-जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात 17 मे रोजी भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले आहे. या संदर्भात 21 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून 25 मेपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्यास 27 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना जिल्हा भाजपाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. यावेळी त्यांंच्यासह भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे उपस्थित होते. सादर निवेदनानुसार खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करुन रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. आजघडीला रब्बीच्या धानाची कापणी पुर्णत्वास आली आहे. तर खरीपाचा हंगामही डोक्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी शेतकर्यांच्या हातात दमडीही नाही. शेतकर्यांना खासगी व्यापार्यांना पडक्या किंमतीत आपले धान विकावे लागत आहे. येत्या काही दिवसात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे 25 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास 27 मे पासून शेतकर्यांच्या हक्कासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे. यासोबतच शेतकर्यांच्या कर्जाच्या रक्कमेची दरवर्षी पूर्ण परतफेड केल्यावर देण्यात येणारे 50 हजार प्रोत्साहन अनुदान व शेतकर्यांना धानविक्रीवर दिला जाणारा सातशे रुपये बोनस त्वरीत देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.