मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची शहर राष्ट्रवादीची निवेदानाद्वारे मागणी
देवरी,दि.22:- स्थानिक शहरातील गटारे गाळकचऱ्याने तुंबलेली आहेत. परिणामी, गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरात डासांनी हैदोश मांडला आहे. या गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई होणे गरजेचे आहे. पावसाच्या दिवसात देवरीकरांना साथरोगांच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने गटारे मोकळी व स्वच्छ करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना एका निवेदनाद्वारे (दि.20)केली आहे.
दरवर्षी, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून देवरी शहरातील सर्व तुंबलेली गटारांची साफसफाई करून किटकनाशक फवारणी केली जाते. मात्र. यावर्षी असे कोणतेही काम नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाकडून होताना दिसत नाही. देवरी शहरातील बहुतेक सर्व प्रभाग आणि विशेषतः1,5,6,9 आणि 14 या प्रभागातील गटारांच्या सफाईविषयी सांगून सुद्धा कोणतीही हलचल दिसत नाही. परिणामी, पावसाळ्यापूर्वी जर नगरप्रशासनाने गटारांची सफाई केली नाही, तर ऐन पावसाच्याच्या दिवसात हिवताप, डेंग्यू सारख्या साथरोगांचा सामना देवरीकरांना करावा लागू शकतो.
असे गंभीर संकट कोणत्याही नगरवासींवर येऊ नये, यासाठी खबारदारी घेत गटारांची मान्सूनपूर्व स्वच्छता आणि फवारणीचे व्यवस्थापन योग्यरीत्या करण्यात यावे. शहरात कोणत्याही भागात पावसाचे पाणी तुंबुन राहणार नाही आणि कोठेही घाणीचे साम्राज्य राहणार नाही, याची खबरदारी घेत प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकारी श्री. पाटणकर यांना जातीने लक्ष देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे देवरी तालुका उपाध्यक्ष दिलीप दुरुगकर, शहर अध्यक्ष मुकेश खरोले, दिपेश टेभंरे, सुजीत अग्रवाल, मुन्ना अंसारी, अरविन्दं शेेडे, मोसीन अन्सारी, कैलास कोडापे,आलीक अंसारी उपस्थित होते.