अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांवर महसुल विभाग मेहरबान…?
चिचगड/ गोंदिया, दि.22 – देवरी तालुक्यातील पीताबंरटोला गावपरिसरातून गेल्या दोन दिवसापासून अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन होत आहे. महसुल विभागाकडे तोंडी तक्रार करुनही महसूल प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. ऐकेकाळी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा जोमात होता. त्यावर आळा बसताच आता देवरी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. तालुक्यातील नदी व अनेक डोंगराचे उत्खनन झाल्याने देवरी तालुक्यातील जंगल हळूहळू ओसाड पडायला लागला आहे. परिणामी, तालुक्यातील पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केला जात आहे.
सविस्तर असे की, देवरी तहसील कार्यालयाने मुरुम ऊत्खननासाठी दिलेल्या वाहतुक परवान्यावर (रॉयलटीवर) सदर कंत्राटदाराला गट क्रमाकं २१८ भर्रेगाव या गटातुन १०० ब्रास मुरुम ऊत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सदर मुरुम उत्खनन भर्रेगाव या गावातील गट क्रमाकं २१८ येथुन न होता महसुल विभागाच्या मेहरबानीने व कंत्राटदाराच्या मुजोरीने पीतांबरटोला या गावपरीसरातुन होत आहे. पीताबंरटोला या ठिकाणाहून अवैधरीत्या ट्रॅक्टरने मुरुम वाहतुक सुरु आहे. विशेष म्हणजे, महसुल विभागातील काही लोकांना हाताशी धरून तालुक्यातील पठारसदृष्य भागातून मुरूमाचे अवैध उत्खनन जोमात सुरू आहे.
पीतांबरटोल्याच्या मुरुम बिनारॉयलटी उत्खननाचा प्रकार मागील दोन दिवसापासून गावाच्या आतील भागातून जेसीपी क्रमाकं MH-29 AD-8171 च्या मदतीने ट्रॅक्टर वाहनांद्वारे मुरुमाचाी वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. परिणामी, देवरी महसुल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने शासनाला लाखोंचा फटका बसत आहे. अशा प्रकारे गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवून तालुक्यातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. असे असताना महसूल विभाग कोणतीही कार्यवाही न करता डोळ्यावर पट्टी बांधून झोपेचे सोंग का घेत आहे, हे न उलघडणारे कोडे आहे.
उल्लेखनीय म्हणजे गेल्या काही महिन्यापासून राज्यावर कोविड-19 चे संकट घोंगावत आहे. सर्वत्र टाळेबंदी आणि संचारबंदी असल्याने राज्याचे महसुली उत्पन्न घटले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गौणखनिजाची होणारी अवैध वाहतुक आणि संबंधित विभागाची त्याकडे होणारी डोळेझाक ही अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. टाळेबंदीच्या सुरवातीला गेले अनेक महिने घरकुलांच्या गरीब लाभार्थ्यांना साधी वाळू मिळाली नाही. एकाद्याने वाहतुक करण्याचा साधा विचारही केला तरी पोलिस आणि महसुल विभागाच्या दराऱ्यामुळे कोणाची हिमंतही होत नव्हती. मग सामान्य नागरिकांवर कार्यवाहीचा बडगा उचलणारे प्रशासन मोठ्या माश्यांवर कार्यवाही करण्याचे सोडून त्यांना पाठबळ कसे देतात, असा सवाल नागरिकांना राज्यसरकारला केला आहे.
माहिती घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठवते- तलाठी आरती मेश्राम
दरम्यान, पीतांबरटोला गावातील होत असलेल्या अवैध मुरुम ऊत्खनना संदर्भात पीतांबरटोला येथील तलाठी आरती मेश्राम यांच्यासी या उत्खननाची माहिती घेतली असता दोन दिवसापासून अवैध प्रकारे सुुरु असलेल्या मुरुम उत्खननाची माहीती नसुन सदर जागेची चौकसी करुन याचा अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याचे तलाठी मेश्राम यांनीं सांगितले.
संपादकाशीच बोलेल- तहसीलदार बोरुडे
याच पीतांबरटोला अवैध मुरुम उत्खननाची माहिती देवरीचे तहसीलदार यांच्यासी घेण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही पत्रकार आहात काय…? व तुम्ही पत्रकार असाल तर तुमच्या संपादकासी माझे बोलणे करुन द्या, मगच तुम्हाला माहिती देतो, अशी दमदाटी देवरीचे तहसीलदार यानीं तालुक्यातील ऐका पत्रकाराला केल्याचाही आरोप आहे.
उत्खननाची परवानगी देणाऱे अधिकारीच माहिती देतील- उपविभागीय अधिकारी विश्वास श्रीसाठ
ज्या अधिकार्याने सदर मुरुम उत्खननाची परवानगी दिली तोच व्यक्ती या प्रकरणाची तुम्हाला माहिती पुरवेल कारण रॉयल्टीची परवानगी मी दिलेली नाही. तरी लवकरच पींताबरटोल्याच्या मुरुम उत्खननाची चौकशी करण्यात येईल व दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल.