कामगार कल्याण केंद्र तिरोडा तर्फे वेल्डींग तंत्रज्ञ प्रशिक्षण शिबीर  

0
14

गोंदिया,दि.7 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्राद्वारे कामगार व कामगार कुटूंबियांच्या कल्याणाकरीता विविध कार्यक्रमाचे, शिबिराचे आयोजन करीत असते. त्याच अनुषंगाने कामगार कल्याण केंद्र तिरोडा, अदानी कौशल्य विकास केंद्र व अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा यांच्या संयुक्त विद्यामाने  वेल्डींग तंत्रज्ञ या अभ्यासक्रमाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर 23 एप्रिल ते 21 मे 2022 पर्यंत ऑनलाईन घेण्यात आले व 23 मे ते 4 जुलै 2022 पर्यंत ऑफलाईन प्रात्यक्षिक शिकविण्यात आले. 4 जुलै रोजी अदानी कौशल्य विकास केंद्र तिरोडा येथे समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त कामगार विभाग नागपूर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विजय गांधेवार जनरल मॅनेजर अदानी फाऊंडेशन, राजु गोरठेकर जनरल मॅनेजर अदानी गृप, हरिप्रसाद अडथडे एच.आर. अदानी गृप, बिमुल पटेल अदानी फाऊंडेशन सिनीयर अकाऊंटंट, राहुल शेजोकर प्रोडक्शन ऑफिसर, राजकुमार मोरे सेंटर मॅनेजर अदानी कौशल्य विकास केंद्र, कांचन वाणी कामगार कल्याण अधिकारी नागपूर, रविंद्र चव्हाण व नेतराम ठवकर प्रशिक्षक उपस्थित होते.

       या शिबिरात कामगार कल्याण निधी भरणा करणारे 11 प्रशिक्षणार्थी व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे 8 प्रशिक्षणार्थी असे एकूण 19 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. समारोप प्रसंगी 12 प्रशिक्षणार्थींना अदानी गृप व कामगार कल्याण विभागातर्फे जॉब ऑफर लेटर व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ताम्रदिप जांभूळकर संचालक कामगार कल्याण केंद्र तिरोडा व कल्पना बोहणे यांनी परिश्रम घेतले.