आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा   – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
14

 गोंदिया,दि.18 : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्यामधील पोषणमूल्यामुळे आहारातील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन दैनंदिन आहारात तृणधान्याचा समावेश करावा असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३  साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

          या सभेत पौष्टीक तृणधान्याबाबतचे महत्व, उपयोगीता, जिल्हयात या पिकासाठी वाव यासाठी सर्व विभागाचा समन्वय याबाबतचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी विस्तृत सादरीकरण केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यावेळी उदय खर्डेनविस उपस्थित होते.

         आहारात तृणधान्य वापरासाठी जनजागृती करण्याबरोबरच तृणधान्य उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

           सन २०२३ हे पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी तृणधान्यामध्ये असलेले पोषक मुल्य व त्याचे आहारातील महत्व जाणून घेऊन तृणधान्याचा नियमित आहारात समावेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत जिल्हयातील शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या सभेत वर्षभर जिल्हयात राबवावयाच्या कार्यक्रमाबाबत रूपरेषा आखण्यात आली.  त्यात मुख्यत्वे आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग आदींनी सहभाग घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

           जानेवारी हा महिना बाजरी पिकांसाठी समर्पित करण्यात आला आहे. फेब्रुवारी मध्ये ज्वारी, मार्च महिन्यात महिला दिन आधारित कार्यक्रम, एप्रिल मध्ये शासकीय कार्यालये येथील उपहारगृहात पौष्टिक अन्न, मे मध्ये माती परीक्षण, जून मध्ये पौष्टिक धान्य, जुलै महिन्यात कृषी दिन, ऑगस्ट मध्ये राजगिरा, सप्टेंबर महिन्यात राळा, ऑक्टोबर मध्ये वरई, डिसेंबर महिना नाचणी पिकासाठी समर्पित केला आहे. हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असून यात कृषी महोत्सव, विविध कार्यशाळा, शालेय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात विविध उपहारगृहातील शेफ यांना सहभागी करून घ्यावे असे जिल्हाधिकारी म्हणाले.

          प्रत्येक विभागाने समन्वयाने कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी यावेळी आराखडा तयार करण्यात आला. जिल्हयात होण्याऱ्या प्रत्येक कार्यक्रमात व प्रशिक्षणात या विषयावर मार्गदर्शन करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. याप्रसंगी कृषि विभागामार्फत छपाई केलेले पौष्टीक तृणधान्याची घडीपत्रिकाची जिल्हाधिकारी यांचे हस्ते विमोचन करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व अन्य योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.