गोंदिया, दि.8 : दिव्यांग बांधवांनी आपल्याला कधीही कमी लेखू नये. कारण दिव्यांग व्यक्ती सुध्दा प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करुन यश संपादन करीत आहेत. आपला कुणी वाली नाही असे दिव्यांग बांधवांनी मनात विचार ठेऊ नये. दिव्यांग बांधवांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोवार बोर्डींग, न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया येथे 8 मे रोजी आयोजित ‘दिव्यांगांना साहित्य वाटप शिबीर’ कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे हे होते.
विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, प्रमुख अतिथी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, विशेष अतिथी जि.प.समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, वित्त व बांधकाम सभापती संजय टेंभरे, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे मंचावर उपस्थित होते.
केंद्र शासनाने दिव्यांग बंधू-भगिनींसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण होऊन अमुलाग्र बदल घडून येतांना दिसत आहे. राज्य शासनाने नुकताच बजेटमध्ये निराधार, वृध्द व दिव्यांगांसाठी दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सर्वसामान्यांसाठी मर्यादा आता 5 लक्ष रुपये करण्यात आली आहे व केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनही आता शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान स्वरुपात देणार आहे. दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून खासदार सुनिल मेंढे यांनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना साहित्य वितरणाचे संकल्प केले व मोठ्या परिश्रमाने ते पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण 1378 पात्र दिव्यांग बांधवांची निवड करुन आज गोंदिया तालुक्यातील 454 लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घेऊन दिल्ली येथील डॉक्टरांच्या चमुकडून योग्य ती तपासणी करुन मोजमाप करुन घेण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण 1378 लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यांचे सर्व साहित्य आलेले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळी शिबिरे आयोजित करुन पात्र लाभार्थ्यांना साहित्य स्वरुपात सी.पी.चेअर, ट्रायसिकल व्हील चेअर, स्मार्ट फोन प्लस स्मार्ट केन, हिअरींग साहित्य वितरीत करण्यात येणार आहे असे खासदार सुनिल मेंढे यांनी सांगितले.
दिव्यांगांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.
प्रातिनिधीक स्वरुपात जयसिंग बघेले, श्रेयण नागपुरे, अजय ढेकवार, योगेश्वर डोहरे, मयंक बागडे, अभिषेक बरडे, प्रमोद भिसे, कार्तिक बारई, विशाल कटरे व धनराज कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या मार्फत गोंदिया जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना एडीआयपी योजनेंतर्गत मोफत साहित्य साधने व उपकरणे पुरविणेसाठी तालुकानिहाय मोजमाप शिबीरांचे आयोजन माहे सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात आले होते. सदर मोजमाप शिबीरामध्ये गोंदिया जिल्हयातील तालुकानिहाय एकुण १३७८ दिव्यांग लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तिरोडा १६१, गोरेगाव ३०९, देवरी ०३, आमगाव २५, सालेकसा १३, अर्जुनी/मोरगाव १९२, सडक अर्जुनी २२१ व गोंदिया ४५४ अशा एकूण १३७८ दिव्यांग लाभार्थ्यांचा यात समावेश आहे असे प्रास्ताविकातून जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, गटविकास अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, न.प.उपअभियंता अनिल दाते, समाज कल्याण विभागाच्या सहायक सल्लागार वैशाली तायडे व आकाश मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत शुक्ला यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.