जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात
वाशिम, दि. २९ जुन : आजच्या काळात आपल्या सर्वांच्या जीवनात आकडेवारीचे विशेष महत्व आहे. आपल्या दैनंदिन दिनचर्येतील आकडे आपल्या गोष्टी केवळ सोप्याच नव्हे तर वेगवान देखील करतात. आकडेवारीच्या मदतीने आपल्या भूतकाळातील तसेच वर्तमान काळातील गोष्टी स्पष्ट होतात. सांख्यिकी दिन हा प्रत्येक घटकाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. तसेच जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, आर्थिक आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
सांख्यिकी आणि नियोजन क्षेत्रात प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अनुषंगाने २९ जुन रोजी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यकी कार्यालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या कार्यक्रात श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी श्रीमती बुवनेश्वरी यांनी प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, प्रमुख अतिथी म्हणून अकोला शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ.संजय खडक्कार, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी बी.आर. तायडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. खडक्कार म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या कार्य कौशल्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. माहिती संकलनासाठी सॉफटवेअरची भूमिका महत्वाची ठरते. सॉफ्टवेअरव्दारे संकलीत केलेली माहिती ही गुणवत्तापूर्ण असते. त्यामुळे काम करणे सुलभ होते. कामातून प्रत्येक विभागाचे आपले महत्व वाढविले पाहिजे. जिल्हयाचा मागासलेपण दूर करण्यासाठी आपण सर्वांनी चांगले काम केले पाहिजे. सांख्यिकी विभागाने जिल्हयाच्या विकासासाठी प्रयत्नशील असावे. प्रत्येकाने आपले स्वत:चे महत्व वाढवून लोकांना जागृत केले पाहिजे. जिल्हयाच्या विकासासाठी व्हीजन डॉक्यूमेंट बनविले पाहिजे. जिल्हा मागास का आहे याची कारणे शोधून त्यावर काम करावे असे त्यांनी सुचविले.
प्रास्ताविकातून श्री. सोनखास यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा नियोजन समिती काम करते. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम, डोंगरीक्षेत्र विकास कार्यक्रम, पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रम इत्यादी योजनांचे नियोजन सनियंत्रण व अंमलबजावणी तसेच कार्यान्वयीन यंत्रणेने पाठविलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजूरी देणे तसेच निधी वितरणाचे कार्य पार पाडल्या जात असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, संजय नगराळे, सहाय्यक संशोधन अधिकारी हर्षल पिंपळे, दिपक सुर्यवंशी, प्रविण साळी, संतोष खंडारे, महसूल सहाय्यक श्री. प्रफुल हेंद्रे यांच्यासह नियोजन व सांख्यिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.संचालन व उपस्थितांचे आभार श्री .सोनखासकर यांनी मानले .