जिल्हा परिषदेच्या 183 शिक्षकांची पदोन्नती: एका वेतनवाढीचा होणार फायदा

0
8367

गोंदिया, ता. 29: जिल्हा परिषदेच्या 183 शिक्षकांना पदोन्नती मिळून 17 शिक्षकांना विस्तार अधिकारी शिक्षण तर 166 शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदांवर पदोन्नत करण्यात आले. स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात आज (ता. 29) शिक्षकांची पदोन्नती समुपदेश कार्यशाळा पार पडली. पदोन्नतीमुळे शिक्षकांना एका वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून जिल्हा परिषदेच्या या विधायक निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

समुपदेशन कार्यशाळेत जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष. पंकज रहांगडाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती  इंजि. यशवंत गणवीर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी . मुरूगानंथम एम., समाजकल्याण समितीच्या सभापती. श्रीमती पूजा सेठ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गोविंद खामकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक  एस. एच. महामुनी, सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण आणि पदोन्नतीसाठी पात्र सर्व शिक्षक उपस्थित होते.

शिक्षक संवर्गातील आस्थापनाविषयक बाबी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होत्या, त्यामुळे शिक्षक संवर्गामध्ये नकारात्मक वातावरण असल्याचे पहावयास मिळत होते. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाशी पाठपुरावा केला. त्याला यश येवून शिक्षक संवर्गातील विस्तार अधिकारी या पदावर 17 शिक्षकांना तर उच्चश्रेणी मुख्याध्यापक या पदावर 166 शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी शिक्षण विभागाची आस्थापनाविषयक प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यात येत आहेत. दरम्यान पदोन्नत शिक्षकांचे अभिनंदन करून गोंदिया जिल्हा शैक्षणिक विकासात राज्यात अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष  पंकज रहांगडाले यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी शिक्षकांनी कटीबध्द राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इन्जि, यशवंत गणवीर यांनी केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, कोणताही विद्यार्थी शिक्षणात मागे पडणार नाही, याची दक्षता घेवून कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले, शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्गोविंद खामकर, शिक्षणाधिकारी एस. एच. महामुनी यांनी विशेष प्रयत्न केले.
—–
*एक जूलै रोजी व्हावे रूजू*

पदोन्नत शिक्षकांना एका वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी या सर्व पदोन्नत शिक्षकांना एक जुलै रोजी पदोन्नत झालेल्या पदावर रूजू व्हावे लागेल. शिक्षकांना एका वेतनश्रेणीचा लाभ व्हावा, यासाठीच शासनाला पाठपुरावा करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी शनिवारी (ता. 29) कार्यशाळा घेण्याचे निश्चीत केले. पदोन्नत शिक्षकांना जिल्हा परिषद अध्यक्ष  पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर तथा सभापती पूजा सेठ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.
——–