परभणी, दि. 5,:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्हा प्रशासन हे विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघांची सन 1985 ते 2019 पर्यंतची पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार (निवडणूक) सतीश रेड्डी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पूर्वपीठिका-माहिती पुस्तिकेचे कौतुक करत ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे, अभ्यासकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे सुतोवाच मान्यवरांनी केले. पूर्वपिठीकेमध्ये निवडणूक आदर्श आचारसंहिता, पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, तसेच मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या आणि सन 1985 ते सन 2019 पर्यंत परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलीत करण्यात आलेली आहे. या पूर्वपिठीकेसाठी शिवाजी गमे, गजानन शिंदे, दिवाकर जगताप, भगवान ढाकरे, मोहसीन मन्सुरी, सरस्वती साखरे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.