ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

0
24

गोंदिया,दि.१२ः-सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजाग्रुती होण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि.11 ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करुन लोकांना पुढील पिढी सिकलसेलग्रस्त होण्यापासुन जागरुकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय माहुर्ले यांच्या मार्गदर्शनेत सिकलसेल आजार जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. दि.11 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.शिबीरा दरम्यान कार्यक्षेत्रातील एक ते 30 वर्षे वयोगटातील व्यक्तींची मोफत सिकलसेल तपासणी करुन लोकांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन व समुपदेशन कएण्यात आले.
सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. सिकलसेल आजार अनुवांशिक आहे पण संसर्गजन्य नाही. सामान्य लाल रक्त पेशी या गोलाकार व लवचिक असतात तर सिकलसेल लाल रक्त पेशी ह्या विळाच्या आकाराच्या असतात.तसेच त्या कडक असतात.सिकलसेल रुग्णांना अशक्तपणा, सांधेदुखी,सांधे सुजणे,डोळे पिवळसर होणे,असह्य वेदना होणे,लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे असे विविध लक्षणे आढ्ळुन येत असतात.
लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घेण्याचे आवाहन ह्याप्रसंसंगी करण्यात आले.लोकांनी जागरुकपणे असे विवाह टाळले पाहीजे ज्यात दोघेही वाहक असतील,एक वाहक व एक ग्रस्त असेल तर तसेच दोघेही ग्रस्त असतील तर कारण त्यामुळे आपल्या परिवारात होणाऱ्या अपत्याला सिकलसेल हा आजार होऊ शकतो.तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्युबिलिटी तपासणी करावी असे आवाहन डॉ.संजय माहुर्ले यांनी केले.सिकलसेल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथील स्टाफ, अधिपारिचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, समुपदेशक यांनी सहकार्य केले.