फडणवीस-शिंदेमध्ये कोल्डवाॅरची अफवा,ये फेव्हीकल का जोड है टूटेगा नही-उपमुख्यमंत्री शिंदे

0
220

गोंदिया,दि.२१ःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्ड वॉर सुरु असल्याची अफवा पसरविली जात आहे. पण ही केवळ अफवाच असून मुख्यमंत्र्यांसोबत कुठलाच कोल्ड वॉर सुरु नाही. आमच्यात योग्य समन्वय असून आम्ही सोबत राहून पुढील अनेक लढया लढू, ये फेव्हीकल का जोड है टूटेगा नही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.काही लोकांना मला मिळालेला महादजी शिंदे पुरस्कारही खटकत असून या निमित्ताने त्यांनी माझाच नव्हे तर शरद पवाराचांही अपमान केल्याची टिका उबाठा गटावर केली.

ते देवरी येथे शुक्रवारी (दि.२१) शिंदेसेनेतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा व माजी आ. सहषराम कोरोटे यांच्या पक्ष कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, शिंदेसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, युवा नेते डॉ. सुगत चंद्रिकापुरे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते महायुतीने सुरु केलेल्या सवलतीच्या योजना बंद होतील असा भ्रम निर्माण करुन जनतेचे दिशाभूल करीत आहे. लोकसभा निवडणुकीत सुध्दा विरोधकांनी संविधानाच्या नावावर जनतेची दिशाभूल केली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी त्यांची जागा दाखवून दिली. महायुती सरकारने सुरु केलेल्या कुठल्याही सवलतीच्या योजना बंद होणार नसून त्या पुर्ववत सुरुच राहतील असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आजपर्यंत अनेक पदव्या, पुरस्कार मिळाले पण लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सर्वात मोठी ओळख असल्याचे शिंदे यांनी सांगितले.