इटियाडोह धरणाच्या कालव्याचे पाणी शिरले बरडटोली जि.प.शाळेत

0
30

 अर्जुनी मोर.- जिल्हा परिषद शाळा म्हणजे समस्यांचे माहेरघरच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण कमी मात्र समस्याच अधिक झेलाव्या लागत आहे. कुठे इमारत आहे तर शिक्षक नाहीत आणि शिक्षक आहेत तर बसायला इमारत नाही,पावसाळ्याच्या पाण्याने तुडुंब भरलेली शाळा आता मात्र इटियाडोह धरणाच्या कालव्यातील पाण्याने भरू लागली आहे. परीणामी विद्यार्थ्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. गोरगरिबांच्या मुलांचे विघ्न प्रशासनाला दिसून येत नाही म्हणून साहेब…आमच्या पोरांना शिकायला चांगली शाळा द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती तथा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली अर्जुनी मोरगाव येथे एक ते चार वर्ग असून एकूण ३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी शाळेत पावसात पुराचे पाणी तुडुंब भरले असते त्यामुळे किमान १५ ते २० दिवस शाळेत मुलांना विद्यार्जन करता येत नाही. असे असताना आता शाळेवर नवे संकट आले आहे.उन्हाळ्यात जवळच असलेल्या इटियाडोह धरणाच्या कालव्याचे पाणी शाळेत साचून शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. आज ता.१८ ला पाणी शाळेच्या आवारात शिरून संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे. शाळेच्या भिंती जीर्ण होण्याची भीती तर शौचालय बाथरूम तुडुंब भरलेले असल्याने विद्यार्थी शिक्षक यांना शौचालय बाथरूमचा वापर करता येत नाही. परिणामी चिमुकल्या बालकांना संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.

ही अडचण नेहमीचीच होत असून याबाबत वारंवार वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिले असतानाही कोणीही वरिष्ठ अधिकारी तथा पदाधिकारी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. इटियाडोह पाटबंधारे विभागांना वारंवार पत्र देऊन सुद्धा ही समस्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडल्यास प्रशासन व .इटियाडोह पाटबंधारे विभाग जबाबदार असेल आता प्रशासनाणे ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा  शाळा व्यवस्थापन समितीकडून आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.