जागतिक जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

0
16
धाराशिव दि.19 मार्च – जागतिक जलदिनाच्या अनुषंगाने जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून,त्याअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अटल भूजल योजना जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामार्फत १७ मार्च २०२५ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेमध्ये अटल भूजल योजनेत समाविष्ट ४८ ग्रामपंचायतींमधील सरपंच,ग्रामसेवक,प्रगतशील शेतकरी तसेच विहीर व विंधन विहीर मालक यांनी सहभाग घेतला.यावेळी मागणी व पुरवठा आधारित उपाययोजनांची ओळख तसेच जलसंधारणाच्या कामाची देखभाल आणि दुरुस्ती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
गोपाळवाडी (ता. धाराशिव) येथील माजी सरपंच यांनी गावाच्या दुष्काळी परिस्थितीतून भूजल वाढीपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.भगतवाडी (ता. उमरगा) येथील ग्रामसेवकांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आणि प्रोत्साहनपर बक्षिसाचे नियोजन कसे करण्यात आले, याबाबत माहिती दिली.तसेच खेड (ता. धाराशिव) ग्रामपंचायतीने ‘जलयोद्धा – वॉटर वॉरीयर’ पुरस्कार मिळाल्यानंतर दिल्लीत २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतल्याचा अनुभव आणि मॉडेल व्हिलेज बनविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यशाळेदरम्यान वॉटर संस्थेच्या माध्यमातून उपस्थित ग्रामपंचायतींची जलस्पर्धेसाठी नोंदणी करण्यात आली.
यावेळी भूजल तज्ज्ञ डॉ. सी. डी. चव्हाण,कार्यकारी अभियंता मोहन सरवदे,जलसंधारण तज्ज्ञ वैभवराज गायकवाड,ॲड.ब्रह्मदेव माने,समाज विकास तज्ज्ञ आणि जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था समन्वयक डी.सी.राठोड यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे नियोजन व सूत्रसंचालन ॲड.ब्रह्मदेव माने यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,अंमलबजावणी भागीदार संस्था,विविध तज्ञ आणि समुदाय संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.