परभणी, दि.19 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), व जिल्हा कार्यालय, माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लोकसंचलित संसाधन केंद्र, मार्फत स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू व मालाचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणि यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी, नाबार्ड सहायक महाव्यवस्थापक सुनिल नवसारे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कैलास तिडके, एचडीएफसी बँक व्यवस्थापक संघर्ष खाडे, सचिन देशमुख, माविम जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यावेळी उपस्थित होते.
माविमने महिलांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी लघुउद्योजक होऊन आत्मनिर्भर बनावे. लखपती दीदी या योजनेअंतर्गत महिलांनी अर्थसाह्य घेऊन मोठे उद्योजक व्हावे. माविम व विद्यापीठ यांनी संयुक्तपणे महिलांसाठी पॅकेजिंग, लेबलिंग व ब्रॅण्डिंगसाठी काम हाती घेऊन महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करून महिलांना इंटरप्रेनर्स घडवूया, असे डॉ. इंद्रमणि यावेळी म्हणाले.
कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट बँक लिंकेज गटांना आजपर्यंत 52 कोटी रुपयांचे बँक कर्ज वाटप करण्यात आले असून आज प्राथमिक स्वरूपात 8 बचत गटांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आठही लोक संचलित साधनकेंद्रांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी तर सूत्रसंचलन जयश्री टेहरे व गंगासागर भराड यांनी आणि आभार प्रदर्शन भावना कुलकर्णी यांनी केले. यावेळी सर्व सीएमआरसी स्टाफ, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
हे प्रदर्शन 20 मार्च 2025 पर्यंत सिटी क्लब, परभणी येथे ठिक सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. नवतेजस्विनी महोत्सव 2025 मध्ये विविध बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू मालाचे स्टॉल, महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबीर, उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व लोकसंचलित साधन केंद्राचा सत्कार, महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज वितरण व सन्मान माविम मित्र मंडळातील पुरुषांचा सन्मान सोहळा, शासकीय योजनाची माहिती, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, (दि.19) रोजी माविम मित्र मंडळातील पुरुषांचा सन्मान सोहळा, विविध शासकीय योजनाची माहिती, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात वेगवेगळे संस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य व पोषणाविषयी जनजागृती, होममिनिस्टर, महिलांच्या स्पर्धा इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
तर गुरुवार (दि.20) रोजी प्रदर्शनात नव उद्योजक महिलांचे मनोगत, सन्मानपत्र वाटप व पुरस्कार वितरण आणि आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या डाळी, गावरान मसाले, पापड, लोणचे, ज्वेलरी, पनीर, लोणी, दही, तूप, पाणीपुरी, भेळ, चाट भांडार, तृणधान्य, साड्या, महिलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, शोभेच्या वस्तू मातीची भांडी, लाकडी वस्तू, सेंद्रिय खाद्यपदार्थ व फळे भाजीपाला, बेकरीचे पदार्थ, उदबत्ती, मेणबत्ती रेडीमेट गारमेंट तसेच आणखीन बऱ्याच काही व उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी आपण जास्तीत जास्त महिलांनी योग्य हमी भावात मिळणारे वस्तू व मालाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले आहे.