बऱडटोली शाळेला दिली जि.प.अध्यक्षांनी भेट

0
61

शाळेतील समस्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना..
अर्जुनी मोर.,दि.२०ः-तालुक्यातील बरडटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मागील पाच वर्षापासून उन्हाळ्यात इटियाडोह कॅनलचा बॅकवॉटर तर पावसाळ्यात पावसाचे पाणी शालेय परिसरात साचत असल्याने शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कंबरभर पाणी परिसरात साचत असल्यामुळे एक ते चार वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहांच्या वापर करता येत नव्हता, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवून वर्ग घेण्याची वेळ येते.
याच बॅकवॉटरमुळे मंगळवारला (१८) पुन्हा शालेय परिसरात पाणी साचुन गंभीर स्थिती निर्माण झाली होती .तात्काळ शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक समितीने मुख्याध्यापक पुनाराम जगझापे यांच्याशी बैठक घेऊन शिक्षण विभागाला माहिती दिली.यावेळी नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांना प्रकरणाची माहिती दिली.
या गंभीर घटनेची दखल घेत आज (२०) जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी या शाळेला भेट दिली.संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.शालेय व्यवस्थापन समिती,पालक समिती आणि मुख्याध्यापकांशी चर्चा केली.प्रत्येक समस्येचा आढावा घेतला.शिक्षण विभाग, बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना केल्या.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे,स्वच्छ भारत मिशन मधून स्वच्छतागृहाचे बांधकाम, शाळेची उंची वाढवून नवीन इमारत बांधकाम प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.भविष्यात शालेय परिसरात पाणी साचू नये यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कॅनॉलच्या इनलेटला गेट लावण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या.
समग्र शिक्षा अभियान जिल्हा वार्षिक योजना (2024-25) अंतर्गत 13.50 लक्ष रुपयांची वर्गखोली मंजूर झाली असून लवकरच त्याचे बांधकाम सुरु होईल अशी माहिती यावेळी जिप अध्यक्षांनी दिली.
शाळेच्या वतीने अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण,कनिष्ठ अभियंता नरेंद्र बोपचे,पाटबंधारे विभागाचे राऊत, नगरसेवक विजय कापगते,राधेश्याम भेंडारकर,नगरसेविका शीला उईके, सहाय्यक शिक्षिका शिल्पा गहाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋचा भोवते,सदस्य शिल्पा कोकोडे,नरेंद्र गायकवाड,प्रदीप शहारे,नागेश मस्के,शीला दखणे उपस्थित होते.