राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर २ सामंजस्य करार

0
41
-अमेरिकेतील एसीसीटी आणि पीयर्स कॉलेज सोबत विद्यापीठाचा एमओयु
-दोन्ही देशातील विद्यार्थ्यांना घेता येणार शैक्षणिक अभ्यासक्रमाची संयुक्त तसेच दुहेरी पदवी
-अमेरिकेतील एसीसीटी आणि पीयर्स कॉलेजच्या प्रतिनिधी मंडळाची विद्यापीठाला भेट
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अमेरिकेतील दोन शैक्षणिक संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर २ सामंजस्य करार (MoU) केले आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नागपुरातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील या शैक्षणिक संस्थांमध्ये तर तेथील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठाने अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टी (एसीसीटी) आणि पीयर्स कॉलेज यांच्यासोबत गुरुवार, दि. २० मार्च २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU) केले आहे. माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी अमेरिकेतील एसीसीटीच्या उपाध्यक्षा रॉबिन मट्राॅस हेल्म्स आणि पीअर्स कॉलेजच्या चान्सलर व सीईओ डॉ. जुली ए. व्हाईट यांच्यासोबत सामंजस्य कराराचे हस्तांतरण केले. सामंजस्य करारामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच अमेरिकेतील विद्यार्थ्यांना संयुक्त आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त करता येणार आहे.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात पार पडलेल्या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, अमेरिकेतील एसीसीटीच्या उपाध्यक्षा रॉबिन मट्राॅस हेल्म्स, पीअर्स कॉलेजच्या चान्सलर आणि सीईओ डॉ. जुली ए. व्हाईट, पीयर्स कॉलेजचे अध्यक्ष डॉ. मॅथ्यू ए. कॅम्पबेल, पीयर्स कॉलेजच्या आपातकालीन व्यवस्थापन कक्ष प्रमुख डॉ. सारह मिलर, पीयर्स कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुबंध कार्यकारी संचालक सिंडी शार्शमिट, ईकेओ सीईओ आदिती जैन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर, डॉ. सुप्रिया डेव्हिड यांची उपस्थिती होती. सामंजस्य करारानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टी (एसीसीटी) आणि पीयर्स कॉलेज सोबत संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे. संशोधन प्रकल्पांसाठी निधी उभारणे. शिक्षक आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम राबविणे, आंतरराष्ट्रीय परिषद, विविध कार्यशाळा तसेच विशेष सेमिनार आयोजित करणे. संयुक्त शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करणे आणि दुहेरी शैक्षणिक अभ्यासक्रम राबविणे आदी विविध शैक्षणिक बाबींवर कार्य करता येणार आहे. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी अमेरिकेतील प्रतिनिधी त्याचप्रमाणे विद्यापीठातील प्रतिनिधी यांची ओळख करून दिली. एसीसीटीच्या उपाध्यक्षा रॉबिन मट्राॅस हेल्म्स संस्थेविषयी माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक संस्थांसोबत कशाप्रकारे अनुबंध केल्या जात आहे याची माहिती दिली. मानव विज्ञान विद्याशाखेतील विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती दिली. सोबतच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात काय घडत आहे याची उत्सुकता अमेरिकेत देखील असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शिक्षकांसोबत झालेल्या संवादातून सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पीअर्स कॉलेजच्या चान्सलर व सीईओ डॉ. जुली ए. व्हाईट यांनी त्यांच्या कॉलेजमधील विविध शैक्षणिक उपक्रम, विविध अभ्यासक्रम त्याचप्रमाणे पर्यावरणासंबंधी केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची माहिती दिली. संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अभ्यासक्रम शिकविले जात असून अनेक देशातील विद्यार्थी तेथे प्रवेशित असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच विद्यापीठासोबत सामंजस्य करत असताना उत्साहित असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी मनोगत व्यक्त करताना नागपूर हे भारताचा मध्यबिंदू अर्थात हृदयस्थान असल्याचे सांगितले. संपूर्ण जगाला प्राचीन तसेच आधुनिक भारताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नागपूर हे भारतच नव्हे तर जगाचे मजबूत हृदयस्थान बनेल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विषयी माहिती देताना समाजाला देशाप्रती जागरूक करणारे संत असल्याची ओळख त्यांनी अमेरिकन प्रतिनिधींना करून दिली. राष्ट्रसंतांनी दिलेली देशप्रेम तसेच सामाजिक बंधूभावाची शिकवण विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करीत हस्तांतरण करण्यात आले. तत्पूर्वी आयक्यूएसी संचालक डॉक्टर स्मिता आचार्य यांनी विद्यापीठाविषयी संपूर्ण माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून विद्यापीठाचा शैक्षणिक परिसर त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉक्टर विकास जांभुळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
विविध शैक्षणिक विभागांना भेट
अमेरिकेतील एसीसीटी आणि पीयर्स कॉलेजच्या प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांना दिवसभरात भेटी दिल्या. विद्यापीठातील इंक्युबॅशन सेंटर, भौतिकशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग, मानव्य शास्त्रे इमारतीतील विविध विभागांना त्यांनी भेटी देत विविध शैक्षणिक कार्याची माहिती घेतली. विविध शैक्षणिक संशोधनकार्यासाठी उपलब्ध असलेल्या उपकरणांची माहिती जाणून घेतली.