पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत ‘महाड’ सत्याग्रहाचे विशेष महत्व-अॅड.सुनील डोंगरे

0
22
बहूजन समाज पक्षाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

पुणे:दिनांक २० मार्च २०२५,-पुरोगामी महाराष्ट्रात विशेषत: देशाच्या जडणघडणीत, सामाजिक सुधारणेत महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रहाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे यांनी गुरूवारी (ता.२०) केले.अस्पृश्यांना समतेची द्वारे खुली करण्यासाठी आणि जगभरात सामाजिक न्यायाचा संदेश पोहचवणारा महाड चवदार तळाचा सत्याग्रह केवळ पाण्याचा नाही, तर मानवी मूलभूत हक्कासाठी होता.

सामाजिक समानतेसाठी आणि मानवी मूलभूत हक्कासाठी बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहाला ९८ वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्त बसपचे प्रदेश अध्यक्ष अॅड.डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाड चवदार तळ्याला भेट देत महामानवाला अभिवादन केले.यावेळी प्रदेश महासचिव मुकुंद सोनावणे, रामचंद्र जाधव, पुणे जिल्हा प्रभारी महेश जगताप, मोहम्मद शफी, अनिल त्रिपाठी, कार्यकारिणी सदस्य किरण आल्हाड, अॅड.अशोक रामटेके, बाळासाहेब हातागळे, प्रदेश सचिव राम सुमेर जैसवाल तसेच राजपाल गवंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

वर्णव्यवस्थेला आव्हान देत डॉ.बाबासाहेबांनी अपृश्यांसाठी हे तळे खुले करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महामानवाच्या संर्घषाला गाठीशी बांधून ‘सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय’ याच उद्देशाने बसप कार्यरत आहे, असे पुढे बोलतांना अॅड.डोंगरे म्हणाले. विशेष म्हणजे चवदार तळे सत्याग्रहानंतर डॉ.आंबेडकर यांना न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते.परंतु, बाबासाहेबांनी ही लढाई जिंकली.समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आजही शिक्षीत, संघटित होत संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत अॅड.डोंगरे यांनी व्यक्त केले.

‘आम्हीही माणसे आहोत’ हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचे मोल आजही अधोरेखीत होते, अशा शब्दांमध्ये बसपचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानवाला अभिवादन केले. बहुजनांना बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित आणून संघर्ष करावा लागेल. शासनकर्ती जमात होण्यासाठी बसपाच्या राजकीय चळवळीला बळ देण्याचे आवाहन देखील यानिमित्तने डॉ.चलवादी यांनी केले.