तलाव दुरुस्तीवर होणार 92 लाखाचा खर्च
अर्जुनी-मोर.दि.२१ः मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, तलावाचे पुनर्जीवन झाल्यानंतर त्याची साठवणूक क्षमता वाढणार आहे. या तलावामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार. पर्यायाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाल्याने इतर पिकाचे उत्पादन घेण्यास मदत होईल इटखेडा, पळसगाव परिसरात हरित क्रांतीच होईल असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी केले आहे.
तालुक्यातील इटखेडा, घाटी पळसगाव येथील तीन मामा तलावांच्या दुरुस्ती व पुनर्जीवन कामाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. याप्रसंगीत पोर्णिमा ढेंगे बोलत होत्या, जिल्हा जलसंधारण अधिकारी लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदिया च्या वतीने इटखेडा व घाटी पळसगाव येथील मामा तलाव दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. या कामाला सुरुवात करताना पंचायत समितीचे सदस्य भाग्यश्री सयाम, सरपंच वलथरे ,बंडू खुणे ,राकेश पवार, नितीन नाकाडे उपस्थित होते, पुढे बोलताना पौर्णिमा ढेंगे म्हणाल्या की तालुक्यातील मामा तलावाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात मामा तलाव आहेत. त्या तलावांच्या पुनर्जीवनाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तलावातील पाणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरून शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्याची मदत होणार असल्याचेही पौर्णिमा ढेंगे यांनी सांगितले.
असा होणार खर्च निधी
तालुक्यातील गट नंबर 241 मधील तलाव गेट दुरुस्तीसाठी 35 लाख 19 हजार 903 रुपये, घाटी पळसगाव येथील गट नंबर 168 मधील तलाव दुरुस्तीसाठी 14 लाख 88 हजार 651 रुपये, पळसगाव गट नंबर 235 तलावाच्या दुरुस्तीवर 41 लाख 84 हजार 121 रुपये, असे तालुक्यातील तीन माजी मालगुजार तलावाच्या कामावर 92 लाख 52 हजार 675 रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी दिली.