शेतकऱ्यांनो, नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करा- जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
67
  • नवतेजस्विनी कृषि महोत्सव2025 चे आयोजन
  • 21ते 23 मार्च पर्यंत चालणार महोत्सव
  • 150स्टॉलवर मिळत आहे माहिती
  • विविध विषयांवर चर्चा व परिसंवाद
  • जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

        गोंदिया, दि.22: भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील बरेचशे नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी अवेळी पाऊस पडतो, यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत असते. त्यामुळे पिकाची कस वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केली तर नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

         कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 23 मार्च 2025 दरम्यान मोदी मैदान, गोंदिया येथे नवतेजस्विनी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कृषी महोत्सवाचे उद्घाटन (ता.21) श्री. भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

        यावेळी विभागीय कृषि सहसंचालक नागपूर उमेश घाटगे, प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे, पं.स.सभापती गोरेगाव चित्रकला चौधरी, जि.प.सदस्या कविता रंगारी, तुमेश्वरी बघेले, वैशाली पंधरे,सविता पुराम यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

          लायकराम भेंडारकर म्हणाले, सद्यस्थितीत वातावरणीय बदलामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनविन उपक्रम राबवून शेती केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी नवनविन तंत्रज्ञान विकसित होत आहेत, त्याचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी शेती केली तर उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, सदर तीन दिवसीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयावर परिसंवाद, चर्चासत्र, शेतीतील नवनविन प्रयोग, मिश्र पीक पध्दती व एकात्मिक पीक पध्दती, कमी मनुष्यबळावर मात करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा उपयोग, कृषी मालाची प्रक्रिया तसेच शासनाच्या कृषिविषयक विविध योजनांच्या माहितीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कशी करावी याबाबत काही ज्ञान प्राप्त झाले असेलच. सदर माहितीच्या आधारे शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करुन शेती केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. नागरिकांनी आपल्या रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोदो व सावा इत्यादी तृणधान्याचा समावेश करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

          कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी नविन दालन उपलब्ध होण्याचे स्थान आहे. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा असून सुध्दा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे, त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होत आहे. शासनाच्या वतीने सेंद्रीय शेतीसाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे सेंद्रीय शेती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर दयावा असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. सदर तीन दिवसीय कृषी महोत्सवातून शेतकरी निश्चितच काहीतरी सोबत घेवून जावून त्या पध्दतीने शेतकऱ्यांनी शेती करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

         या कृषी महोत्सवात विविध प्रकारचे जवळपास 150 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी या तीन दिवसीय कृषी महोत्सवाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी केले. कार्यक्रमास सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व शेतकरी बांधव, जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी, कृषी प्रक्रिया उद्योजक, महिला बचत गट, उमेदचे बचत गट, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बन्सोड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माविमचे मुल्यमापन अधिकारी प्रदिप कुकडकर यांनी मानले.