मेगा पाणलोट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करा मिशन मनरेगा महासंचालक नंदकुमार

0
35
  • जिल्हा अभिसरण समिती सभा

       गोंदिया, दि.25 : प्रत्येक कुटूंबाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुविधासंपन्न कुटूंब मिशन व सर्वांगिण गावसमृध्दीकरीता मनरेगा योजनेअंतर्गत मेगा पाणलोट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांनी दिल्या.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मेगा पाणलोट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अभिसरण समिती अंतर्गत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भैय्यासाहेब बेहेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) डी.एस.लोहबरे, विभागीय वन अधिकारी तुषार ढमढेरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         श्री. नंदकुमार म्हणाले, हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीतून मोठ्या प्रमाणात पाणलोट विकासातून प्रत्येक शेतीला पाणी तसेच सिंचित बांबू सोबतच फळझाडे, इतर झाडे, फुलपीक, तुती, औषधी वनस्पती व कुरण विकास करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीचे बळकटीकरण करुन उपजिविकेवर अवलंबून असलेल्या कुटूंबाला मनरेगाच्या सहाय्याने सुविधा संपन्न बनविणे व शाश्वत साधन उपलब्ध करुन देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा अभिसरण समिती अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांनी मेगा पाणलोट प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी योग्य नियोजन करुन सदर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्यामुळे प्रकल्प उपजिविकेच्या संधी आणि शाश्वत पध्दतींना समर्थन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सदर प्रकल्पांतर्गत पाणलोट विकास करुन त्यावर आधारित उपजिविका वाढविणारी कामे उदा. फळबाग, पशुपालन व दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, रब्बी पीक इत्यादी वेगवेगळ्या शासकीय विभागांमार्फत लोकांपर्यंत राबविले जातील. सदर प्रकल्पांतर्गत यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून योग्य नियेाजन केले तर गोंदिया जिल्ह्यात पाणलोट व्यवस्थापनासाठी एकात्म दृष्टीकोन स्थापित करण्याकरीता एक महत्वाचा टप्पा ठरेल असेही त्यांनी सांगितले.

        यावेळी भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशनचे (BRLF) चमू प्रमुख विक्रांत देहानकर यांनी सादरीकरणाद्वारे मेगा पाणलोट प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती विशद केली. महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या पाच जिल्ह्यात सदर प्रकल्पाची कामे सुरु आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ॲक्सीस बँक फाऊंडेशन, भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशन (BRLF) व मनरेगा यांचे परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्य करारानंतर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सडक अर्जुनी (Intensive) आणि अर्जुनी मोरगाव, सालेकसा, तिरोडा (Non Intensive) अशा एकूण सहा तालुक्यामध्ये ‘हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत दोन सहकारी सामाजिक संस्था आमगाव, देवरी, सडक अर्जुनी या (Intensive) तालुक्यांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहेत असे त्यांनी सांगितले.

        सभेला भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशनचे चमू प्रमुख विक्रांत देहानकर, जिल्हा समन्वयक नितेश बोपचे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजीत राऊत, तहसिलदार देवरी महेंद्र गणवीर, तहसिलदार सालेकसा एन.एम.कोंडागुर्ले, तहसिलदार सडक अर्जुनी इंद्रायणी गोमासे, तहसिलदार आमगाव मोनिका कांबळे, मत्स्यविकास अधिकारी कोमल नंदागवळी, सहायक प्रकल्प अधिकारी कपिल शर्मा यांचेसह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.