गोंदिया :- खाजगी कायमविना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरटीई 25 टक्के अंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शिक्षण दिले जाते. अशा विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून शाळांना वितरित करण्यात येते. ती आरटीई प्रतिपूर्ती रक्कम रु. 2,26,00,000 मागील काही महिन्यापासून जि. प. शिक्षण विभागाच्या खात्यात जमा झालेली आहे. परंतु उपरोक्त रक्कम शाळांना वितरित करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाकडे जमा झालेली आरटीई प्रतिपूर्ती रक्कम लवकरात लवकर शाळांना वितरित करण्यात यावी याकरिता आरटीई फाउंडेशन महाराष्ट्र जिल्हा गोंदिया यांच्याकडून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मा सुधीर महामुनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी येणाऱ्या 30 ते 31 मार्च पर्यंत आरटीई प्रतिपूर्ती शाळांना वितरित करण्यात येईल असे आश्वासन दिले. निवेदन सादर करतांना आरटीई फाउंडेशन महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष आर. डी. कटरे, राज्य सचिव सुनील आवळे, राज्य कोषाध्यक्ष हिमांशु बिसेन, सदस्य शिवेंद्रकुमार येडे, मोर.अर्जुनी गटशिक्षणाधिकारी चौहान साहेब, दिनेश गुप्ता हे उपस्थित होते.