उष्माघातामुळे जिवित हानी रोखण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
360

 उष्मालाट पुर्वतयारी आढावा सभा

 गोंदिया, दि.27 : मार्च महिना शेवटच्या टप्प्यावर असतानाच उन्हाचे चटके वाढले आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. येत्या पुढील कालावधीत उष्मालाटेमुळे उष्माघात होवून जिवित हानी होवू नये यासाठी आरोग्य व संबंधित यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (ता.27) उष्मालाट पुर्वतयारी बाबत आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारतीय हवामान विभागाद्वारे सद्यस्थितीत विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत्या प्रमाणात राहण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत कोल्ड रुम तयार करुन आवश्यक औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. नागरिकांना उष्मालाट व उष्माघात याबाबत परिपूर्ण माहिती व्हावी याकरीता आरोग्य यंत्रणेने व्यापक प्रमाणात जनजागृती करावी व जनसामान्यांपर्यंत सदर माहिती विविध प्रसार माध्यमातून पोहोचवावी असे त्यांनी सांगितले.

        दुपारी 12 ते 4 पर्यंत उन्हात काम करणाऱ्या नागरिकांवर उष्माघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात होवू शकते, त्यामुळे संबंधित यंत्रणांनी कामगारांसाठी योग्य ती आवश्यक व्यवस्था करावी. येत्या पुढील कालावधीत उन्हात होणारे सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमाचे योग्य नियोजन करणे अपेक्षीत आहे. तसेच सदर कार्यक्रमात आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात मागील वर्षी उष्माघाताने दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून यावर्षी उष्माघाताने कुठलीही जिवित हानी होणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

       यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल यांनी सादरीकरणाद्वारे उष्मालाट व उष्माघात बाबत सविस्तर माहिती विशद केली. याप्रसंगी उष्माघात होवू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत तयार करण्यात आलेले जनजागृतीपर विविध पोस्टरचे जिल्हाधिकारी प्रजित नायर व उपस्थित प्रमुख अधिकारी यांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

       उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.