विद्यापीठाच्या इतिहासात एक हजार शोधनिबंध प्रकाशित करणारे डॉ.संजय ढोबळे पहिले प्राध्यापक

0
38
डॉ. संजय ढोबळे यांचे स्कोपसवर १००० शोधनिबंध
-१०१ पेटंटचे सुद्धा प्रकाशन
नागपूर,दि.३१ :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांचे नुकतेच एक हजार (१,०००) संशोधन निबंध (रिसर्च पेपर) स्कोपस या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्तरावर प्रकाशित झाले आहे. विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या इतिहासात एक हजारच्यावर संशोधन निबंध (रिसर्च पेपर) प्रकाशित करणारे डॉ. संजय ढोबळे हे पहिलेच प्राध्यापक आहे, हे विशेष.
विद्यापीठाला शैक्षणिक स्तरावर पुढे जाण्यासाठी संशोधन पेपर व पेटंट हे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विद्यापीठाला नॅक व एनआरएफ रँकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे असते. अशात विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांचे एक हजारावर रिसर्च पेपर व १०० च्यावर पेटंट प्रकाशित करणे फार महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. ढोबळे यांनी ३२ वर्षाच्या संशोधन व शैक्षणिक अनुभवातून हे उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. ढोबळे हे त्यांच्यासोबत संशोधन करणारे एम एस सी भौतिकशास्त्राचे विद्यार्थी पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून शैक्षणिक स्तरावर कार्य करण्यासाठी मदत करतात. जणू काही संशोधन करणे हा डॉ. ढोबळे यांचा छंदच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विद्यार्थी पण संशोधन करण्याचा आनंद घेतात. त्यांनी एमएससी विद्यार्थ्यांसोबत पेटंट व रिसर्च पेपर सुद्धा प्रकाशित करून विद्यापीठाचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. ढोबळे हे एलईडी, रेडिएशन ड्रासेमेट्री, सोलर सेल, फिंगर प्रिंट, सोयरासिस, कॅन्सरसाठी लागणाऱ्या मटेरियल्सवर कार्य करतात. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या संशोधकांसोबत कार्य करून वरील उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यांना आंतरविद्याशाखीय विषयात कार्य करण्यात अधिक आनंद कौशल्य प्राप्त होतो व विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा होतो, असे ते मानतात. डॉ. ढोबळे यांनी आतापर्यंत ३१ आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे लेखन, ८० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन, २.५ कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प सहजपणे राबविले आहे. मध्य भारतात लुमिनिसेंसवर कार्य करणारी त्यांची लॅब संपूर्ण जगात प्रसिद्ध असून ते जॉन व्होली व नॅचर सारख्या जर्नलचे संपादकाचे कार्य पण करतात. एक हजार रिसर्च पेपर व १०१ पेटंट प्रकाशित करणारे विद्यापीठातील पहिलेच प्राध्यापक ठरल्यामुळे त्यांचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर त्यांचे संशोधक विद्यार्थी व मित्रांनी अभिनंदन केले आहे.