अकोला:-अकोल्यातील मुर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकावर तिकीट चेकरने (टीसी) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुर्तिजापूर येथून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेत या तिकीट चेकरने आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे. सुमेध मेश्राम असे या आत्महत्या करणाऱ्या तिकीट चेकरचे नाव आहे. या घटनेने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती तणावातून सुमेध मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय सुमेध मेश्राम हे घरगुती कारणामुळे तणावात होते. फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी अचानक मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतली. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुमेध मेश्राम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली व त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.