नविन प्रिपेड विद्युत मीटर लावण्यासाठी कंत्राटदाराची बळजबरी

0
2081

अर्जुनी/मोरगाव – गोंदिया जिल्ह्यात कुठेही जनजागृती न करता गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या कंत्राटदाराकडून नवीन प्रिपेड विद्युत मीटर लावण्याची बळजबरी करण्यात येत आहे.तेव्हा हा प्रकार तत्काळ थांबवून प्रिपेड मीटर योजनेबाबत नागरिकांना विविध बाबी पटवून द्याव्यात तसेच ज्या ग्राहकांचे विद्युत मीटर सुरळीत सुरु आहेत अशा ग्राहकांचे विद्युत मीटर बदलण्यात येऊ नये तसेच ज्या ग्राहकांचे विद्युत मीटर खराब,फाल्टी किंवा नादुरुस्त आहेत अशा ग्राहकांचे विद्युत मीटर बदलण्यात यावे अशी मागणी केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जि प दस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केशोरी महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली आहे.गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नागरिकांमध्ये कोणतीही जनजागृती न करता अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या केशोरी व परिसरात नवीन प्रिपेड विद्युत मीटर लावण्यात येत आहेत. काही ठिकाणी बळजबरीने हे नवीन प्रिपेड मीटर लावण्यात येत आहेत. त्यामध्ये सदर मीटर प्रत्येकाला लावणे अनिवार्य नाही त्यामुळे सबंधित महावितरणच्या कंत्राटदाराने ग्राहकाला विचारुन किंवा बळजबरीने नविन प्रिपेड विद्युत मीटर लावु नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी दिला आहे.