नवेगावबांध पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्धवट काम; कंत्राटदार फरार, प्रशासनाचे दुर्लक्ष

0
62

अर्जुनी-मोर.– तालुक्यातील नवेगावबांध येथील श्रेणी-1 पशुवैद्यकीय दवाखान्यात उभारण्यात येणाऱ्या सुविधा अर्धवट अवस्थेत सोडल्या गेल्या असून, संबंधित कंत्राटदार फरार झाल्याचे उघड झाले आहे. पशुपालक आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या ओपन शेड आणि उपचारासाठी चौफेर टाकीचे काम अपूर्ण आहे.

कंत्राटदाराने लोखंडी शेड उभारले असले तरी, उर्वरित काम थांबवून फरार झाला. आश्चर्याची बाब म्हणजे, काम अपूर्ण असतानाही त्याने संपूर्ण बिल काढल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय, पशुवैद्यकीय इमारतीच्या डागडुजीचे कामही निकृष्ट दर्जाचे असून, सतत सिलींग कोसळण्याच्या तक्रारी आहेत.

प्रशासन अनभिज्ञ?

या प्रकरणावर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मंजुरी प्रक्रियेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले होते का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तपास आणि कारवाईची मागणी

माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली जाणार आहे.या घडामोडीमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये नाराजी असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.