दुसऱ्या दिवशी मिळाले प्रेत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अर्जुनी मोर.—तालुक्यातील कन्हाळगाव/वडेगाव स्टेशन येथील आर्यन प्रमोद शहारे वय वर्ष 14 हा दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावाजवळून जाणाऱ्या इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्यात मित्रासह अंघोळीला गेला असता कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही. आर्यन हा इसापूर इटखेडा हायस्कूल चा इयत्ता आठव्या वर्गात शिकत होता. दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास इटखेडा गावाजवळ इटियाडोह मुख्य कालव्याचा किलोमीटर 39 च्या जवळपास त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. महसूल अधिकारी निमकर तसेच अर्जुनी मोर पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार डोंगरवार यांनी पंचनामा करून प्रेत शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास कन्हाळगाव येथील मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील व बहीण आहे. आर्यनच्या अचानक जाण्याने त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अर्जुनी मोर.चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.