मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेच्या हीरक महोत्सव

0
17

व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या संस्थेच्या ६० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव

मुंबई, दि. ०6एप्रिलः भारतातील व्यवस्थापन शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या अग्रणी आणि प्रतिष्ठीत संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या मुंबई विद्यापीठाच्या संस्थेने ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. व्यवस्थापनाचे जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण देणाऱ्या या संस्थेचे रुपांतर डीम्ड टू बी विद्यापीठात होणार असल्याचे आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. ‘सीईओ फॅक्टरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेच्या ६० वर्षाच्या गौरवशाली इतिहासाच्या हिरक महोत्सव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संस्थेची मागील ६० वर्षांची वाटचाल आणि कामगिरी अतुलनीय आणि गौरवास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात हा हीरक महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, प्रसिद्ध उद्योगपती शेखर बजाज, अजय पिरामल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, आयआयएम मुंबईचे संचालक डॉ.मनोज तिवारी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या संचालिका प्रा. कविता लघाटे यांच्यासह देश-विदेशातील माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेला डीम्ड टू बी विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास जागतिक दर्जाचे व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्यास जगभरातील विद्यार्थी येथे येऊ शकतील. विद्यापीठाच्या रुपांतरणासाठी उद्योगपती अजय पिरामल यांच्या एक सदस्यीय समितीने काम पाहावे असे सांगत याकामी शासनाचे सर्वतोपरी सहाय्य लाभणार असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा देत, हीरक महोत्सवानंतर या संस्थेची ही नवी सुरुवात असून संस्थेने व्यवस्थापनाच्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिकाधिक उत्कर्षासाठी काम करावे असे त्यांनी सांगितले. भारत जगातील तृतीय मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असून वैश्विक बदलत्या गरजा लक्षात ठेऊन येथील विद्यार्थ्यांनी भारतासह जगाचे नेतृत्व करावे असेही त्यांनी सांगितले.

जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचे १९७७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा उल्लेख करत सर्वाधिक सीईओ या संस्थेने दिले असून सर्वार्थाने सीईओ फॅक्टरी म्हणून या संस्थेची कामगिरी सर्वोत्तम राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक राजधानीत आरबीआय, सेबी आणि एनएसई सारख्या संस्था आहेत. त्याच धर्तीवर सर्वोत्तम व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेला विद्यापीठ दर्जा मिळावा यासाठी माजी विद्यार्थी म्हणून पुढाकार घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला विद्यापीठाचा दर्जा बहाल केल्यास नक्कीच बदल दिसून येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी १९६५ पासून अव्याहतपणे व्यवस्थापनाचे उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा लौकीक कायम राखणाऱ्या जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या गौरवशाली प्रवासावर प्रकाश टाकला. या संस्थेने देशाच्या कॉर्पोरेट जगाला आकार दिला असल्याचे सांगितले. पुढेही ही संस्था उद्योन्मुख क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन नावीन्यता आणि उद्योजगकता यावर भर देत डीपटेक स्टार्ट अपसाठी पुढाकार घेऊन मार्गक्रमन करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आयआयएम मुंबईचे संचालक डॉ.मनोज तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी केले तर स्वागतपर भाषण संस्थेच्या संचालिका प्रा. कविता लघाटे यांनी केले.