दर्जेदार व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे तिरोडा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण उत्साहात

0
95

तिरोडा,दि.०९ः शैक्षणिक सत्र 1 ऑगस्ट 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक शाळेतून दर्जेदार व्हिडिओ तयार करून या स्पर्धेच्या शासकीय संकेतस्थळावर अपलोड केलेल्या शिक्षकामधून विविध गटात पुरस्कार प्राप्त करणार्या शिक्षकांना तालुकास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार वितरीत करण्यात आले. सदर स्पर्धा विविध गटात इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी व अकरावी ते बारावी या गटांसाठी विषयानुसार भाषा,गणित, विज्ञान,समाजशास्त्र,पर्यावरण इत्यादी विषयावर आयोजित करण्यात आली होती.यात व्हिडिओ बनवून स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शिक्षकांना प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रुपये 3000, 2000 व 1500 अनुक्रमे याप्रमाणे तालुक्यातून एकूण 44 शिक्षकांना  जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात वितरीत करण्यात आले.यावेळी सर्वात जास्त पारितोषिक पटकावणारे शिक्षक श्री वासनिक जिल्हा परिषद शाळा भंबोडी यांचे विशेष गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी विनोदकुमार चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विस्तार अधिकारी दिलीप साकुरे, ब्रजेश मिश्रा गट समन्वयक, यु.पी. बिसेन केंद्रप्रमुख,मधुकर ठाकरे केंद्रप्रमुख,रवी भगत तत्कालीन केंद्रप्रमुख ,श्री बारेवार,देवीदास हरडे साधन व्यक्ती यांच्या उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रागकुमार ठाकरे साधन व्यक्ती गटसाधन केंद्र तिरोडा तसेच आभार प्रदर्शन प्रतिमा लांडगे साधन व्यक्ती यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बारेवार,श्रीदेवीदास हरडे, श्री पडोळे यांनी अथक परिश्रम घेतले.