*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ पत्रे, लेख व दस्तऐवजांचे डिजीटायजेशन
*विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाला सुरुवात
मुंबई, दि. ०९ एप्रिलः २०० हून अधिक पुस्तके, दुर्मिळ लेख, साहित्य, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, प्रबुद्ध भारत आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक, बहिष्कृत हितकारिणी सभा नियमपत्रक, महाराष्ट्रातील जतिभेद काल व आज (गोमंतकच्या संदर्भात)१९६३, मुंबई प्रदेश शेड्युल्ड कास्टस फेडरेशन पहिले स्नेह संमेलन, अध्यक्ष : आर. डी. भंडारे यांचे उद्घाटन भाषण १५ व१६ ऑगस्ट १९५३, वतनदार गाव कामगार परिषद ब्रम्हपुरी (सातारा परिषद), रविवार ३ एप्रिल १९२७ चा बहिस्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मुकनायक, जनता साप्ताहिकाचे ऑक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, २७ ऑक्टोबर १९५६ चा प्रबुद्ध भारतचा अंक, १३ मे १९२० चे शिक्षण आयोगाचे ए. बी. क्लार्कचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देश्यून लिहलेले पत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड, आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, चॅम्पीयन ऑफ ह्युमन राईट्स, द आंबेडकर एरा, महात्मा फुले गौरवग्रंथ, शोधाच्या नव्या वाटा, गुलामी, नवे पर्व, महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली विविध पत्रे, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन ग्रंथालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओळखपत्र, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील ११ ऑक्टोबर १९१६ मधील विद्यार्थी पास, ५ जानेवारी १९३१ ला लंडनहून बडोदा येथील महाराजांना लिहीलेले पत्र, वसंत व्याख्यानमालेच्या निमंत्रणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चिटणीस यांनी लिहलेले १५ एप्रिल १९२७ रोजीचे पत्र, कोलंबिया विद्यापीठाचे २५ ऑक्टोबर १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहलेले पत्र, राजगृह दादर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंकरदास बर्वे यांना ३० सप्टेंबर १९३६ ला लिहलेले पत्र, समता या पाक्षिकाचा २९ जून १९२८ चा पहिला अंक, शेतकऱ्याचा असूड, गुलामी, महात्मा फुले समग्र वाङमय, जोतिपर्व, किसान का कोडा, महात्मा फुले आज सत्यशोधक समाज, फुले आंबेडकरी वाड्मयकोश, तृयीय रत्न, इशारा त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या मसुद्याची प्रत अशा विविध ग्रंथांबरोबर दुर्मिळ पत्रे, लेख आणि दस्तऐवज आणि पुस्तकांचे प्रदर्शन आज मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्राच्या नवीन इमारतीत भरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व दुर्मिळ पत्रे, लेख आणि दस्तऐवजांचे जतन व संवर्धन करून डिजिटाईज करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या दरम्यान महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आज दुर्मिळ पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंती सप्ताह कार्यक्रमाच्या निमंत्रिका प्रा. मनिषा करणे, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार यांच्यासह समितीचे सदस्य, विद्यापीठातील विविध प्राधिकरणातील सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हे ग्रंथ प्रदर्शन फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत खुले राहील.
संयुक्त जयंती सप्ताहाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘भारतीय संविधान निर्मितीचे ५५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी १८९५ ते १९४६ पर्यंत घटना निर्मितीच्या वेगवेगळ्या प्रयत्नांच्या प्रवासावर सखोल मांडणी केली. त्यामध्ये ५५ वर्षाच्या या प्रवासात संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक योगदान कसे लाभले याचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१९ पासून संविधानाच्या निर्मितीत सहभाग घेऊन सर्वोत्कृष्ट घटना भारताला दिली असल्याचे सांगत, १४४ कोटी सर्व भारतीय बांधवाना एका सूत्रात बांधणारी महाशक्ती म्हणजे भारतीय संविधान असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या वतीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून नजीकच्या काळात मुंबई विद्यापीठास मंजूर झालेल्या भारत सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यापीठामार्फत विविध उपक्रम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात ‘भारतीय संविधानाची ७५ वर्षे’ या विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. सुरेश माने यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात भारतीय संविधानामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेची हमी मिळत असल्याचे सांगितले. परंतू बदलत्या परिस्थितीत यामध्ये काही प्रमाणात तफावत जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित या सात दिवसीय संयुक्त जयंती सप्ताहामध्ये कालावधीत विविध कार्यक्रम, परिसंवाद, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, प्रदीर्घ वाचन, गीत गायन स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, महामानवांचा शाहिरी जलसा, स्थळ भेट आणि संविधान गौरव यात्रा अशा अनुषंगिक कार्यक्रमांचे नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. संविधानाचा भक्कम आधार असलेल्या भारतीय लोकशाहीचा जागर, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांप्रती आपली बांधिलकी जपली जावी अशा आशयाच्या विविधांगी कार्यक्रमांची आखणी जयंती समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.