मुंबई, दि. १० एप्रिलः मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता प्रांगणात भरविण्यात आलेल्या महिला कौशल्य विकास मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० आणि ११ एप्रिल २०२५ दोन दिवस चालणाऱ्या या महिला कौशल्य विकास मेळाव्याचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा आणि अधिसभा सदस्य रुची माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या ५० बचत गटांतील महिलांनी स्वयं प्रेरणेने बनवलेल्या विविध घरोपयोगी वस्तू जसे आभूषणे, कापडी पिशव्या, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग, कूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, फॅन्सी चप्पल व विविध खाद्यपदार्थ अशी निरनिराळी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मुंबई विद्यापीठ व मुंबई महानगरपालिका नोंदणीकृत महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरण व आर्थिक स्वालंबनासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. या व्यापक दृष्टिकोनातून आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संयुक्त उपक्रमातून या वर्षी बचत गटांतील महिलांना विशेष संधी देण्याच्या प्रयत्नातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने जनतेच्या पसंतीला उतरत आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन महिलांनी अत्यंत काळजीपूर्वक, कष्टाने व स्वयं प्रेरणेने बनवलेल्या उत्पादनाची खरेदी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.